बांधकाम कामगारांची होणार नोंदणी
By admin | Published: June 3, 2016 12:29 AM2016-06-03T00:29:58+5:302016-06-03T00:29:58+5:30
राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते.
पिंपरी : राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने पिंपरी-चिंचवड महापालिकेला बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आयुक्त दिनेश वाघमारे यांनी नोंदणी मोहीम राबविण्यास हिरवा कंदील दाखवत कार्यकारी अभियंता यांची नोंदणी प्रमाणपत्र देण्यासाठी नियुक्ती केली आहे. यामुळे शहरातील बांधकाम कामगारांची नोंदणी होऊन त्यांना शासकीय लाभ मिळण्याचा अडसर दूर झाला आहे.
आयुक्त वाघमारे यांनी मोहीम राबविण्याबाबतचे आदेश दिल्याचे कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर यांनी सांगितले. महापालिकेतर्फे बांधकाम कामगार नोंदणी व जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी योग्य समन्वय साधून बांधकाम नाका कामगार व महापालिकेच्या छोट्या-मोठ्या साइटवरील कामगारांची नोंदणी व त्यांना मिळणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
राज्य शासनाच्या नगरविकास विभागाने ६ नोव्हेंबर २०१५ रोजी या संदर्भात अधिसूचना जारी करत प्रत्येक महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीतील बांधकाम कामगारांच्या नोंदणीसाठी ३१ डिसेंबर २०१५ पूर्वी धडक मोहीम राबविण्याचे आदेश दिले होर्ते मात्र, तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांनी याकडे गांभीर्याने न पाहता दुर्लक्ष केले होते. नोंदणी मोहिमेस हिरवा कंदील मिळाला आहे. महापालिकेच्या बांधकाम साइटवरील कामगार व नाका कामगार यांना कार्यकारी अभियंता नोंदणी प्रमाणपत्र देणार असून, याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. शहरातील हजारो बांधकाम कामगारांची लाभार्थी म्हणून शासनाच्या महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार नोंद होणार आहे.
या मागणीसाठी बांधकाम कामगार सेनेचे अध्यक्ष जयंत शिंदे, किशोर हातागळे, सचिन गुंजाळ, गंगाधर कांबळे व महादेव धनवे यांनी पाठपुरावा केला होता.(प्रतिनिधी)
नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येतात. विमा योजना, शिष्यवृत्ती, उच्च शिक्षणासाठी अर्थसाहाय्य, प्रथम लग्नासाठी अर्थसाहाय्य, प्रसूती लाभ, कामावर मृत्यू झाल्यास नुकसानभरपाई, अंत्यविधी मदत व वारसास प्रतिवर्ष अर्थसाहाय्य अशा महत्त्वपूर्ण योजनांचा त्यात समावेश आहे.