नाल्यांवर बांधकामे, सिमेंटीकरण, अरुंद नदीपात्र! पाण्याची वाट बुजवली अन् पुराने शहराची वाट लागली
By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 03:24 PM2024-07-26T15:24:29+5:302024-07-26T15:24:52+5:30
शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही
पुणे : शहरातील पावसाचे पाणी वाहून नेण्याचे ‘आरोग्य’ बिघडले असून, त्यामुळे संततधार पावसामुळे देखील पुण्याचे जनजीवन विस्कळीत होत आहे. पाणी वाहून नेण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याने पुण्यात सातत्याने पूरस्थिती निर्माण होत आहे. ही प्रतिकारशक्ती कमी होण्यासाठी पुणेकरच जबाबदार आहेत. कारण अनेकांनी नाल्यांवर बांधकामे केली, सिमेंटीकरण केले, नदीपात्र अरुंद, नाले बदलले. परिणामी पावसाच्या पाण्याला वाटच मिळत नाही.(Pune Heavy Rain)
काही वर्षांपूर्वी पुण्यामध्ये पाच-पाच दिवस संततधार पाऊस पडत असे. तरीदेखील कुठेही पूरस्थिती निर्माण व्हायची नाही. पण गेल्या काही वर्षांमध्ये या घटना नेहमी होत आहेत. कमी वेळेत अधिक पाऊस म्हणजे ढगफुटीसदृश पावसानेही यापूर्वी पुणे तुंबले आहे. परंतु, बुधवारी रात्रीपासून मात्र जोरदार पाऊस नव्हता. केवळ संततधार होता. त्यानेही पुण्याची अवस्था बिकट बनली. त्याचाच अर्थ पुणे शहराची पावसाला तोंड देण्याची प्रतिकारशक्तीच कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
गेल्या काही वर्षांमध्ये शहरीकरण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे नैसर्गिक जलस्रोत, भूमिगत झरे आणि नाल्यांचे मार्ग बदलले आहते. परिणामी पाणी जिरण्याचे प्रमाण कमी झाले. या सिमेंटीकरणाच्या बांधकामामुळे शहरातील ४५ टक्के लहान-मोठे जलस्रोत गायब झाले आहेत. जलस्रोतांच्या नैसर्गिक प्रवाहांना धक्का लागला आहे, परिणामी पुराचा धोका वाढत आहे. संततधार पावसामुळे शहरातील पश्चिम भागातील जनजीवन विस्कळीत झाले. बऱ्याच सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, काही ठिकाणी संरक्षक भित कोसळली. सिंहगड रस्त्यावर तर पाणीच पाणी झाले. पावसाच्या पाण्याचे योग्यप्रकारे निचरा होत नसल्याने, वाहून जाण्यासाठीचे मार्ग बंद केल्यानेच पुराचा धोका वाढत आहे.
जलस्त्रोत नाहीसे !
भूगोल व जलस्त्रोताचे अभ्यासक डॉ. श्रीकांत गबाले यांनी ‘इम्पॅक्ट ऑफ अर्बनायझेशन ऑन जिओग्राफिक इन्व्हायर्नमेंट ऑफ पुणे ॲन्ड सराऊंडिग’ या विषयावर संशोधन केले आहे. पुणे शहरात गेल्या तीन दशकांत तीनशेहून अधिक लहान-मोठे जलस्रोत नाहीसे झाले आहेत. शहरात संततधार तर घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. दिवसभरात १०० मिमी पाऊस झाला. खरंतर पाणी खूप मुरलं पाहिजे, जे मुरत नाही. केवळ ५ टक्के पाणी मुरत आहे. ९५ टक्के पाणी वाहून जाते. आता नाले कमी झाले. पाण्याचा प्रवाह वाढतो, तेव्हा नाल्यात घाण अडते आणि तुंबते. ते काढण्याचा प्रयत्न केला जात नाही. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होते, अशी माहिती डॉ. गबाले यांनी दिली.
पाणी का साठते त्याची कारणे ?
- शहरातील नाले अरूंद झाले
- वाटेल तसे नाले-ओढ्यांचे मार्ग बदलले
- टेकडी उतारावरील प्रवाह अडवले
- पावसाचे पाणी जाण्यासाठी योग्य मार्ग नाहीत
- नाले, ओढ्यात राडारोडा टाकल्याने पाणी तुंबते
- नाल्यात बऱ्याचदा खूप कचरा टाकल्याने पाणी तुंबतो
- सिमेंटीकरणामुळे पाणी जिरणे कमी झाले
- ९५ टक्के पावसाचे पाणी वाहून जाते
...मग पूर येणारच ना !
शहरामध्ये सिमेंटीकरणामुळे रस्ते गुळगुळीत बनले आहेत, त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जाते. नाले गायब केले असून, तिथे इमारती उभ्या आहेत. त्यावर कारवाई केली जात नाही. सिंहगड परिसरात तर अशाप्रकारचे बांधकाम खूप आहे. खरंतर शहरामध्ये पाणी तुंबण्याच्या घटना सातत्याने होत आहेत. शहरातील रस्ते तयार करताना या पावसाच्या पाण्याचा विचार केलेला नाही. पाऊस पडल्यानंतर २५ ते ३० टक्के पाणी जमिनीत मुरते. पण आता केवळ ५ टक्के पाणी मुरते. बाकीचे रस्त्यावरून वाहते. मग पूर येणारच आहे.
स्वतंत्र विभाग हवा !
शहरात चुकीची बांधकामे झाल्याने पाणी मुरण्यासाठी, प्रवाह वाहण्यासाठी पुरेसी जागा नाही. महापालिकेने योग्य नियोजन करुन पाणी मुरण्यासाठी उपाय करणे अपेक्षित आहे. त्यासाठी धोरण ठरवायला हवे. महापालिकेत त्यासाठी स्वतंत्र विभागच हवा. त्यामध्ये तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेता येईल. शहरातील पूरस्थितीबाबत नुकतेच एक चर्चासत्र झाले. त्यातही नगररचना करताना त्याविषयाचा एक विभागच हवा आणि केवळ या आपत्तीवर काम करणारा हवा, अशी मागणी झाली होती.
- शहरात एकूण २३४ नाले ६६२ कल्वर्ट. नाल्यांची लांबी ३६२ किलोमीटर.
- ८८ किलोमीटरच्या नाल्यांच्या ठिकाणी धोकादायक पूरस्थिती उद्भवते.
- शहरातील ६६२ कल्वर्ट मधील ११६ कल्वर्ट धोकादायक