पुणे महापालिकेच्या " राडारोडा " योजनेला बांधकाम व्यावसायिकांचा ठेंगा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2020 03:32 PM2020-02-07T15:32:18+5:302020-02-07T15:36:14+5:30
शहरात दिवसाला किमान 100 टन बांधकाम राडारोडा तयार होत आहे.
पुणे : महापालिकेने शहरातील राडारोडा उचलण्याकरिता राबविलेल्या उपक्रमाला बांधकाम व्यावसायिकांनी ठेंगा दाखविला असून एकाही व्यावसायिकाने या उपक्रमाला प्रतिसाद दिला नसल्याचे समोर आले आहे. शहरात दिवसाला किमान 100 टन बांधकाम राडारोडा तयार होत आहे. त्यावर प्रक्रिया करण्याकरिता पालिकेने सशुल्क सेवा सुरु केली आहे.
पालिकेकडून चार वर्षांपुर्वी सुरु केलेली योजना यशस्वीरित्या सुरु झालेली नाही. योजनेला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेने दोन महिन्यांपुर्वी बांधकाम व्यावसायिकांनी त्यांच्या साईट्सवरील राडारोडा महापालिकेला द्यावा त्यावर प्रक्रिया करण्यासंदर्भात नोटीस काढली होती. या सुविधेसाठी पालिका एक किलोमिटर 1 टनासाठी 19 रुपये आकारणार आहे. त्याचबरोबर 195 रुपये प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराला देणार आहे. परंतू, अद्याप एकाही व्यावसायिकाने पालिकेकडे चौकशी केलेली नाही.
गोळा केलेल्या राडारोड्यावर प्रक्रिया करण्याकरिता प्रकल्पाची उभारणी करण्यात येणार असून मार्चमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित होईल अशी अटकळ बांधण्यात येत होती. परंतू, जागेचा प्रश्न असल्याने डिसेंबर महिन्यामध्ये घनकचरा विभागाने बांधकामाचा राडारोडा उचलण्यासाठी सुविधा सुरु केली. यासाठी टोल फ्री नंबर सुध्दा देण्यात आला होता. परंतू, हा अट्टाहास केवळ स्वच्छ भारत अभियानासाठी केल्याची टीका होत आहे.
=====
पालिकेने बांधकाम व्यावसायिक ,शासकीय संस्था यांना यासंदर्भात नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. अद्याप कोणीच नोंदणी केली नाही. महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील सर्व बांधकाम व्यावसायिकांना माहिती कळवून नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
- ज्ञानेश्वर मोळक, सह महापालिका आयुक्त, घनकचरा व्यवस्थापन विभाग