जप्त वाहनांचा होणार ई-लिलाव, ७०० वाहनांमध्ये ३२० चारचाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:12 AM2018-03-16T00:12:09+5:302018-03-16T00:12:09+5:30
चुकीच्या ठिकाणी लावल्या म्हणून अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा महापालिकेच्या वतीने प्रथमच ई-लिलाव करण्यात येत आहे. एकूण ६९० वाहने असून, त्यात चारचाकी वाहने ३२० आहेत. त्यातील काही वाहने परराज्यातील आहेत.
- राजू इनामदार
पुणे : चुकीच्या ठिकाणी लावल्या म्हणून अतिक्रमण विभागाने जप्त केलेल्या वाहनांचा महापालिकेच्या वतीने प्रथमच ई-लिलाव करण्यात येत आहे. एकूण ६९० वाहने असून, त्यात चारचाकी वाहने ३२० आहेत. त्यातील काही वाहने परराज्यातील आहेत.
अतिक्रमण विभागाच्या वतीने प्रथमच अशी कारवाई करण्यात येत आहे. अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी त्यासाठी पुढाकार घेतला आहे. आयुक्त कुणाल कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी यासाठीची सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आहे. खास लिलावकर्ता नियुक्त करण्यात आला असून, येत्या आठवड्याभरात लिलावासाठीची सर्व वाहने पाहण्यासाठी म्हणून महापालिकेच्या विविध ठिकाणच्या गोदामांमध्ये खुली केली जातील.
महापालिका लवकरच राबवणार असलेल्या वाहनतळ धोरणाचाच हा एक भाग असल्याचे यावर बोलले जात आहे. अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील रस्त्यावर, चौकात लावलेली वाहने पकडली जातात. बऱ्याच दिवसांपासून एखाद्या सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या वाहनेही यात ताब्यात घेण्यात येतात. गेल्या वर्षभरापासून महापालिकेची ही कारवाई सुरू आहे. जप्त केलेली सर्व वाहने एका गोदामात लावून ठेवण्यात येतात. १ हजारपेक्षा जास्त वाहने ताब्यात घेण्यात आली असल्याचे जगताप यांनी सांगितले.
काही जणांनी महापालिकेशी संपर्क साधून दंड जमा करून वाहने सोडवून घेतली; मात्र बरीच वाहने तरीही अनेक महिन्यांपासून पडून होती. याबाबत आरटीओबरोबर संपर्क साधला असला त्यांनी लिलावाच्या कायदेशीर प्रक्रियेची माहिती दिली. त्यानुसार वाहनाच्या क्रमांकावरून वाहनमालकाचा पत्ता वगैरे माहिती जमा करण्यात आली. त्यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यासाठी मुदत देण्यात आली. त्यामुळे काही जणांनी वाहने सोडवून नेली. मुदतीत न आलेल्यांना पुन्हा वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याची नोटीस पाठवण्यात आली.
त्यानंतरही संपर्क साधता न आलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. ६९० वाहनांमध्ये ३२० वाहने चारचाकी आहेत. त्यात क्रमांकच नाही अशी एकूण ३४ वाहने आहेत. १६५ चारचाकी वाहने फक्त पुण्यातील म्हणजे एम एच १२ आहेत. अन्य वाहने दुसºया शहरांमधील आहेत. १६ वाहने परराज्यातील आहेत. दुचाकी वाहनांची संख्या ३७० आहे. त्यात पुण्यातील २४५ आहेत. ८० वाहनांना क्रमांक नाही. उर्वरित वाहने दुसºया शहरातील आहेत. यात एका सहाचाकी वाहनाचाही समावेश आहे तर तीनचाकी वाहने ४५ आहेत.
या सर्व वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. ती पाहण्यासाठी खुली असल्याचे लवकरच जाहीर करण्यात येईल. त्यानंतर लिलावाची तारीख जाहीर होईल. त्यात इच्छुक आॅनलाइन पद्धतीने सहभागी होऊ शकेल. महापालिका प्रथमच अशा पद्धतीने वाहनांचा लिलाव करीत आहे. लिलावातील वाहने चांगल्या स्थितीतील आहेत, असे जगताप म्हणाले.
>टपºया, शेडच्या लिलावात मिळाले २८ लाख
टपºया, शेड यावरील कारवाईत पकडलेल्या साहित्याचाही महापालिकेने नुकताच लिलाव केला. त्यातून महापालिकेला २८ लाख रूपये मिळाले. त्यातीलही बरेचसे साहित्य अनेकांनी दंड जमा करून सोडवून नेले. अन्य साहित्य लिलावात गेले.
वाहनतळ धोरणापेक्षाही शहरातील रस्ते मोकळे ठेवणे हा यातील मुख्य उद्देश आहे. कारवाईनंतर आता महापालिकेकडे वाहने ठेवण्यासाठी जागाच शिल्लक नाही. त्यामुळे लिलाव करण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यातून महापालिकेला फायद्यापेक्षाही रस्ते मोकळे व्हावेत हा विचार आहे.
- माधव जगताप, उपायुक्त अतिक्रमण विभाग