ग्राहक दिन ठरू नये सरकारी पातळीवरील औपचारिक बाब
By राजू इनामदार | Published: December 11, 2024 06:21 PM2024-12-11T18:21:08+5:302024-12-11T18:22:25+5:30
ग्राहक पंचायतीची अपेक्षा: मोबाइल कंपन्या, बांधकाम व्यावसायिक यांनाही बोलवावे
पुणे - संपूर्ण भारतात साजरा करण्यात येणारा २४ डिसेंबर हा ग्राहक दिन जिल्ह्यात फक्त एक सरकारी उपचार म्हणून साजरा केला जातो. तसे न करता ज्यांच्याकडून ग्राहक सर्वाधिक त्रस्त करणाऱ्या मोबाइल कंपन्या, बांधकाम व्यावसायिक, ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्या यांनाही या दिनासाठी बोलवावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या पुणे शाखेने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
याविषयीचे लेखी पत्रच पंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवले आहे. पंचायतीच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाचे अध्यक्ष विलास लेले, पुणे शहर अध्यक्ष विजय सागर यांनी सांगितले की, दरवर्षी प्रशासनाच्या वतीने या दिनासाठी फक्त काही सरकारी अधिकारी, ग्राहक संघटनांचे प्रतिनिधी यांनाच बोलावले जाते. ज्यांच्याकडून ग्राहकांना सर्वाधिक त्रास होतो, अशा कंपन्यांच्या प्रतिनिधींनाही या दिवशी बोलावले पाहिजे. त्यातून या कंपन्या व ग्राहक यांच्यात विश्वासाचे नाते तयार होईल व त्रासाचे प्रकार कमी होतील. त्यामुळेच यंदाच्या २४ डिसेंबरच्या आधीच आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना याविषयी लेखी कळवले असल्याची माहिती लेले यांनी दिली.
मोबाइल कंपन्यांचे प्रतिनीधी, ब्रॉड बँड व वाय-फाय सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, डीटीएच सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनीधी, ऑनलाइन सेवा देणाऱ्या कंपन्यांचे प्रतिनिधी, टीव्ही चॅनलचे प्रतिनिधी, बँका आणि फायनान्स कंपन्यांचे प्रतिनिधी, इन्शुरन्स कंपन्यांचे प्रतिनिधी, व्यापारी व उद्योजकांचे प्रतिनिधी, मेडिकल असोसिएशन व केमिस्ट असोसिएशनचे प्रतिनिधी, बांधकाम व्यवसाय असोसिएशनचे अशी यादीच लेले यांनी पत्रात दिली आहे.
पंचायतीच्या पुणे विभागाचे पदाधिकारी रवींद्र वाटवे, प्रकाश राजगुरू, सुनील नाईक, अंजली देशमुख, विणा दीक्षित, राजश्री दीक्षित, विजया वाघ, अंजली करंबळेकर, अंजली फडणीस, माधुरी गाणू यांच्या पत्रावर स्वाक्षऱ्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांबरोबर यासंदर्भात चर्चाही झाली आहे. त्यांनी पंचायतीच्या या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आम्ही दिलेली यादी त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिली असून, या सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींना २४ डिसेंबरला ग्राहक दिनाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली आहे. - विलास लेले, अध्यक्ष, अ. भा. ग्राहक पंचायत