ग्राहक निवारण न्यायमंचाचा रिलायन्स रिटेल लिमिटेडला दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:14 AM2021-09-14T04:14:55+5:302021-09-14T04:14:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : मोबाईल घेण्याच्या सहा महिने आधीच वॉरंटी कालावधी सुरू झाला असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या एका ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मोबाईल घेण्याच्या सहा महिने आधीच वॉरंटी कालावधी सुरू झाला असल्याचे सांगत फसवणूक करणाऱ्या एका रिटेल लिमिटेड दुकानदाराला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचाने ग्राहकाला नऊ हजार रुपये ७ ऑगस्ट २०१८ पासून वार्षिक ८ टक्के व्याजाने परत देण्याचा आदेश दिला आहे. तसेच तक्रारदारांना नुकसानभरपाईपोटी तीन हजार, तर तक्रारीच्या खर्चापोटी एक हजार रुपये द्यावे, असेही न्यायमंचाने आदेशात म्हटले आहे.
न्यायमंचाचे अध्यक्ष जे. व्ही. देशमुख, सदस्य अनिल जवळेकर, शुभांगी दुनाखे यांनी हा आदेश दिला. याबाबत नूर नूरमहम्मद इनामदार यांनी हडपसर येथील रिलायन्स रिटेल लिमिटेड विरुद्ध अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केली होती. तक्रारदार यांनी संबंधित लिमिटेड येथून २० मार्च २०१६ रोजी सॅमसंग कंपनीचा एक मोबाईल नऊ हजार रुपयांना खरेदी केला होता. त्यानंतर २० ऑगस्ट २०१६ रोजी तक्रारदार यांच्या मोबाईलचा रिंगर खराब झाल्यामुळे त्यांनी तो हडपसर येथील अधिकृत सर्व्हिस सेंटरमध्ये दुरुस्तीसाठी दिला. त्यावेळी मोबाईलची वॉरंटी ९ ऑगस्ट २०१६ रोजी संपली असल्याने दुरुस्तीचा खर्च सात हजार रुपये इतका येईल, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. मात्र, मोबाईल २० मार्च २०१६ ला खरेदी केला असताना त्याची वॉरंटी ९ ऑगस्ट २०१६ रोजी कशी संपली? अशी विचारणा तक्रारदारांनी केली. मात्र, दुकानदाराने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. ३० सप्टेंबर २०१६ रोजी तक्रारदार यांनी डिस्प्ले-पीस खरेदी केला असल्याने वॉरंटी देता येत नाही, असे तक्रारदारांना सांगण्यात आले. त्यावेळी विरुद्ध पक्षाने फसवणूक केली असून, जुना मोबाईल आपल्याला विकल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले. वारंवार विनंती करूनही तक्रारदारांना मोबाईलची रक्कम परत न केल्याने त्यांनी ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात धाव घेत तक्रार दाखल केली. मानसिक त्रासापोटी रक्कम आणि मोबाईलसाठी भरलेले नऊ हजार रुपये परत मिळावे, अशी मागणी या तक्रारीत करण्यात आली होती.