ग्राहकांनो जाणून घ्या...मिठाई विक्रेत्यांसाठीच्या या सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:02+5:302021-09-09T04:16:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अकरा सूचना केल्या आहेत. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मिठाई विक्रेत्यांसाठी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अकरा सूचना केल्या आहेत. या सूचनांचे तंतोतंत पालन न केल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. नागरिकांनाही मिठाई खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाचे सह आयुक्त शिवाजी देसाई यांनी केले आहे.
सुरक्षित व निर्भेळ खाद्य पदार्थ उपलब्ध होण्यासाठी त्याचबरोबर भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने दक्षता घेतली जात आहे. नियमांचे उल्लंघन करून विक्रेत्यांनी भेसळीच्या वस्तू विकल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. भेसळ रोखण्यासाठी दिवाळी सणापर्यंत ही मोहीम राबविण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले.
चौकट
मिठाई विक्रेते/दुकानदारांनी या सूचनांचे करावे पालन
* मिठाईच्या ‘ट्रे’वर दर्शनी भागात वापरण्यायोग्य दिनांक टाकावा.
* कच्चे अन्न पदार्थ व खवा हा परवानाधारक/नोंदणीधारक अन्न व्यावसायिकाकडून खरेदी करावा. जेणेकरून त्यांची खरेदी बिले विक्रेत्याकडे असावीत.
* प्रत्येक अन्न व्यावसायिकाने त्यांच्या विक्री बिलावर अन्न सुरक्षा व कायदा २००६ अंतर्गत प्राप्त परवाना/नोंदणी क्रमांक नमूद करणे अनिवार्य आहे.
* पदार्थ तयार करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करावा.
* अन्न पदार्थ स्वच्छ व सुरक्षित ठिकाणी साठवावेत.
* त्वचा व संसर्गजन्य रोगापासून मुक्त याबाबत कामगारांची वैद्यकीय तपासणी करावी.
* मिठाई तयार करताना केवळ फूडग्रेड खाद्य रंगाचा १०० पीपीएमच्या आतच वापर करावा.
* दुग्धजन्य पदार्थांची मिठाई ही ८-१० तासांच्या आत खाण्याबाबत पॅकेजिंग मटेरियलवर निर्देश देण्यात यावेत.
* माशांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जाळीदार झाकणे, बंदिस्त शोकेस असावे.
* स्वत:चे आणि कर्मचाऱ्यांचे लसीकरण करून घ्यावे.
* मिठाई/फरसाण तयार करताना वापरण्यात येणारे खाद्यतेल हे २-३ वेळाच वापरण्यात यावे. त्यानंतर ते आरयूसीओ अंतर्गत बायाडिझेल कंपन्यांना देण्यात यावे.
चौकट
नागरिकांनी वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी
* मिठाई, दूध व दुग्धजन्य अन्नपदार्थ खरेदी करताना फक्त नोंदणी/परवानाधारक आस्थापनांकडून खरेदी करावी.
* मिठाई, दूध व दुग्धजन्य पदार्थ ताजे व आवश्यकतेनुसार खरेदी करावे.
* खरेदी करताना ‘यूज बाय डेट’ पाहूनच खरेदी करावी.
* उघड्यावरील तसेच फेरीवाल्यांकडून मिठाई, खवा (मावा) खरेदी करू नये.
* माव्यापासून बनविलेल्या मिठाईचे सेवन शक्यतो २४ तासांच्या आत करावे. तसेच साठवणूक योग्य तापमानाला (फ्रीजमध्ये) करावे.
* दुग्धजन्य मिठाई ८-१० तासाच्या आत सेवन करावी.
* मिठाईवर बुरशी आढळल्यास त्यांचे सेवन करू नये. खराब/चवीत फरक जाणवला तर सदर मिठाई नष्ट करण्यात यावी.