पुणेकरांचे थंडीतले ‘मद्यप्रेम’ वाढले; यंदाच्या नोव्हेंबरमध्ये गेल्या वर्षीपेक्षा जास्त खप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 01:20 PM2021-12-09T13:20:41+5:302021-12-09T13:33:09+5:30
प्रज्ञा केळकर-सिंग पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात दारूच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. ...
प्रज्ञा केळकर-सिंग
पुणे : गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात पुणे जिल्ह्यात दारूच्या विक्रीत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. देशी दारूची विक्री ३.७ टक्क्यांनी तर विदेशी दारूची विक्री ४.२ टक्क्यांनी वाढली आहे. बिअरच्या विक्रीत थेट १६.६ टक्क्यांनी वाढ झाली असून वाईनच्या विक्रीतही ११.४ टक्के वाढ झाली आहे. उत्पादन शुल्क विभागाकडून ही माहिती मिळाली. हिवाळ्यात मद्यपानाचे प्रमाण नेहमीच्या तुलनेत वाढल्याचे पाहायला मिळते. मात्र अतिरिक्त मद्यपानाने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. त्यामुळे मद्यपानाच्या आहारी जाऊ नये, असा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात आहे.
थंडीच्या दिवसात रक्त गोठते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. हृदयाचे ठोके अनियमित झाल्याने हृदयावर विपरित परिणाम होतो. अशातच वारंवार मद्यपान केल्याने हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी अनेकांना वारंवार ‘एकच प्याला’ रिचवावासा वाटतो. थंडी आणि मद्यपानाची सांगडच अनेकजण घालताना दिसतात. दिवाळी, सुट्ट्यांमधल्या सहली, नाताळचा सण, ३१ डिसेंबरच्या पार्ट्या, नवीन वर्षाचे स्वागत अशा विविध कारणांनी या काळात मद्यपानाचे प्रमाण वाढलेले दिसते. आजकाल अनेक जण ‘स्टेटस सिम्बॉल’ म्हणूनही मद्यपान करतात. मात्र, कोणत्याही वेळी केलेले मद्यपान आरोग्यास हानीकारकच असते, असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला.
अतिमद्यपानामुळे थंडीच्या दिवसांतही घाम फुटणे, चक्कर, थकवा, अस्वस्थता, छातीत दुखणे असे त्रास जाणवू शकतात. ही सर्व हृदयविकाराची लक्षणे असू शकतात. मद्यपानामुळे शरीरातील उष्णता आणि कमी तापमान यांचे संतुलन बिघडल्यास हायपोथर्मियाची स्थिती उद्भवू शकते. हृदयविकाराचे कोणतेही लक्षण अथवा भीती जाणवल्यास वेळ वाया न घालवता त्वरित डॉक्टरांकडे गेल्यामुळे मोठा धोका टळू शकतो.
नोव्हेंबर महिन्यातली दारूविक्री (आकडे लिटरमध्ये)
मद्यप्रकार --२०२०-२०२१ --२०२१-२२ --विक्रीत वाढ (%)
देशी दारू --२५ लाख ५६ हजार ९१६ --२६ लाख ५१ हजार १२३ --३.७
विदेशी दारू --३० लाख ८६ हजार २६९ --३२ लाख १५ हजार ६६५ --४.२
बिअर --३१ लाख २३ हजार ६०५ --३६ लाख ४० हजार ८६५ --१६.६
वाईन --१ लाख ३१ हजार ३०७ --१ लाख ४६ हजार २९३ --११.४
“मद्यपानामुळे हृदयातील रक्तवाहिन्या तात्पुरत्या प्रसरण पावतात. मात्र, मद्यपानाचे हृदयावर आणि पर्यायाने संपूर्ण शरीरावर विपरीत परिणाम होतात. त्यामुळे हिवाळ्यात अथवा इतर कोणत्याही ऋतूत कधीही मद्यपान शरीरासाठी हानीकारकच ठरते.”
- डॉ. ऋतूपर्ण शिंदे, हृदयरोगतज्ज्ञ