कस्टमर केअरला साधला संपर्क अन् तीन लाखांना बसला फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:21 AM2021-09-02T04:21:12+5:302021-09-02T04:21:12+5:30
पुणे : क्रेड ॲपवरून बँक खात्यात भरणा केला असतानाही कोणताही मेसेज न आल्याने त्याने कस्टमर केअरशी संपर्क साधला. तो ...
पुणे : क्रेड ॲपवरून बँक खात्यात भरणा केला असतानाही कोणताही मेसेज न आल्याने त्याने कस्टमर केअरशी संपर्क साधला. तो नंबर नेमका सायबर चोरट्याचा निघाला. अन् त्याने सर्व माहिती घेऊन तरुणाच्या दोन क्रेडिट कार्डवरून ३ लाख १९ हजार रुपये काढून घेऊन फसवणूक केली. याप्रकरणी आंबेगाव येथील एका ३२ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. हा प्रकार २३ ऑगस्ट २०२१ रोजी घडला.
फिर्यादी यांच्याकडे महिंद्रा बँक व स्टेट बँक ऑफ इंडियाचे क्रेडिट कार्ड आहे. या दोन्ही कार्डची सर्व डिटेल्स क्रेड ॲपवर अपलोड करून त्याद्वारे ते पेमेंट करतात. त्यांनी बचत खात्यात ८९ हजार ९४९ रुपये भरले. मात्र, त्याचा कोणताही मेसेज त्यांना आला नाही. त्यामुळे त्यांनी क्रेड ॲपच्या कस्टमर केअरवर संपर्क साधला. त्यावरील व्यक्तीने त्यांनी ॲपमध्ये त्याची माहिती भरायला सांगितली. त्यांनी त्यानुसार क्रेड ॲपच्या ॲड्रेस मेन्यूमध्ये माहिती भरताच फिर्यादी यांचा मेल अकाऊंट हॅक करून त्याद्वारे बँकेच्या संबंधित खातेधारकांनी संगनमत करून त्यांच्या दोन्ही क्रेडिट कार्डद्वारे ३ लाख १९ हजार ८९६ रुपयांची आर्थिक फसवणूक केली. पोलीस निरीक्षक विजय पुराणिक तपास करीत आहेत.