कंटेनरची दुचाकीला धडक; युवक ठार, महिला जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:42 AM2018-03-17T00:42:12+5:302018-03-17T00:42:12+5:30
एमआयडीसीतील रस्त्यावर निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात येथील डोंगरवस्तीवरील दुचाकीस्वार युवक जागीच ठार, तर महिला जखमी झाल्याची माहिती ठाणेअंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली.
चाकण : येथील एमआयडीसीतील रस्त्यावर निघोजे (ता. खेड) गावच्या हद्दीत भरधाव कंटेनरने दुचाकीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात येथील डोंगरवस्तीवरील दुचाकीस्वार युवक जागीच ठार, तर महिला जखमी झाल्याची माहिती ठाणेअंमलदार दत्तात्रय जाधव यांनी दिली. याप्रकरणी वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा अपघात आज (दि. १६) सकाळी ६ वाजून ५० मिनिटांनी झाला. या अपघातात संजय सकु जाधव (वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे, ता.खेड, जि.पुणे ) हा दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाला, तर शारदा गजानन जाधव जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर चाकण येथील खाजगी रुग्णालयात उपचार चालू आहेत.
दिलीप दलशिंग पवार (वय ३२, रा. डोंगरवस्ती, निघोजे ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कंटेनरचालक अर्शद गुलामसाहेब जमाल (वय २८, रा. व्ही.आर.सी. आॅफिस, लोणीकंद, ता. हवेली, जि. पुणे, मूळ रा.ता. जयनगर, जि. कोडरमा, झारखंड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज सकाळी संजय हा आपली दुचाकी (एमएच १४ एफक्यू ८३८१) वरून शारदा यांना घेऊन डोंगरवस्ती ते महाळुंगे रस्त्याने जात होते.
पाठीमागून येणाऱ्या कंटेनर (एमएच १२ केपी ९६८७) चालकाने भरधाव वेगाने व निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीला पाठीमागून ठोस दिली. या अपघातात संजयच्या तोंडावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सी. एम. गवारी हे पुढील तपास
करीत आहेत.