मुलीला खाकीत पाहण्याचे वडिलांचे स्वप्न अधुरेच! रस्ता ओलांडताना कंटेनरने उडवले, आरोपी जेरबंद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 09:27 AM2023-03-17T09:27:55+5:302023-03-17T09:29:01+5:30
रस्ता ओलांडत असताना एका कंटेनरने त्यांना उडविले...
पुणे : लेकीला पोलिस भरतीसाठी पुण्यात घेऊन आलेल्या पित्याला भरधाव कंटेनरने धडक दिली, त्यात त्यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर पळून गेलेल्या कंटेनरचालकाला शिवाजीनगर पोलिसांनी अखेर अटक केली असून, अंकुश राजेंद्र राख (रा. मु. हाजीपूर, पो. ब्रह्मागाव, ता. आष्टी. जि. बीड) असे त्याचे नाव आहे.
हा अपघात शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयासमोर सोमवारी पहाटे साडेचार वाजता घडला होता. त्यात सुरेश सखाराम गवळी (वय ५५, रा. नाशिक रोड) यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या मुलीची पोलिस भरतीत मैदानी चाचणी असल्याने तिला मैदानावर सोडून ते चहा पिण्यासाठी बाहेर आले होते. रस्ता ओलांडत असताना एका कंटेनरने त्यांना उडविले.
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणी नव्हते. अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यानंतर पोलीस हवालदार रणजित फडतरे यांना हा कंटेनर बाबा रोडवेज जालना येथील असल्याची माहिती मिळाली. तो वाघोली येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी सापळा रचून गुरुवारी चालकाला पकडले.
कंटेनर मुंबईकडे जात असताना अचानक अपघात झाल्याने राख हा मुंबईला न जाता गावी निघून गेला होता. त्यानंतर वाघोली परिसरात आला होता. शिवाजीनगर ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे व त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.