कंटेनरची दुचाकीला धडक; महिलेचा मृत्यू, पती गंभीर जखमी, पुणे - पंढरपूर महामार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2024 10:23 AM2024-12-10T10:23:21+5:302024-12-10T10:23:33+5:30
पती पत्नी घराकडे जात असताना जेजुरीहून भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली
वाल्हे : पुणे - पंढरपूर महामार्गावरील पवारवाडी फाट्यावर जेजुरीहून निरेकडे भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवर मागे बसलेल्या महिलेचा मृत्यू झाला असून, दुचाकीस्वार तिचा पतीदेखील गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ७) सायंकाळी सहाच्या दरम्यान दिलीप गजानन पवार हे पत्नी छाया पवार यांना घेऊन दुचाकी (एमएच १२ - एफएक्स ५७००) वरून वाल्हे येथील घराकडे जात असताना पवारवाडी फाट्यावर त्यांच्या दुचाकीस जेजुरीहून भरधाव वेगात निघालेल्या कंटेनरने (एमएच १२ - डब्ल्यूएक्स १७३९) पाठीमागून जोरदार धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवरील दिलीप पवार व त्यांच्या पत्नी छाया पवार गंभीर जखमी झाले होते. जखमींना ग्रामस्थांच्या मदतीने जेजुरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच छाया दिलीप पवार (रा. वाल्हे) यांचा मृत्यू झाला. याबाबतची फिर्याद अनिल दिलीप पवार (वय २८) यांनी वाल्हे पोलिस चौकीत दाखल केली आहे. तर पोलिसांनी कंटेनरचा चालक रमेशसिंह सीताराम सिंह (मूळचा रा. बिहार) याला ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार, हवालदार भाऊसाहेब भोंगळे करीत आहेत.