कंटेनर महागल्याने द्राक्ष निर्यातदारांच्या खर्चात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:12 AM2021-01-20T04:12:45+5:302021-01-20T04:12:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : द्राक्ष निर्यातीसाठी सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे द्राक्ष निर्यातदार त्रस्त झाले आहेत. निर्यात कंटेनरचे भाडे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : द्राक्ष निर्यातीसाठी सातत्याने येत असलेल्या अडचणींमुळे द्राक्ष निर्यातदार त्रस्त झाले आहेत. निर्यात कंटेनरचे भाडे दुप्पट झाले असून या व अन्य अडचणींमध्ये केंद्र सरकारने त्वरित लक्ष घालावे, अशी मागणी द्राक्ष बागायतदार संघटनेने केली आहे.
द्राक्ष बागायतदार संघाचे खजिनदार कैलास भोसले यांनी सांगितले की यामुळे उत्पादकाच्या खर्चात वाढ होणार आहे. त्या प्रमाणात दर मिळाला नाही तर नुकसान होणार आहे. आधीच निर्यातदार कंपन्यांसाठी देण्यात येणारी प्रोत्साहन रक्कम केंद्र सरकारने बंद केली आहे. त्याचा फटका सहन करत असतानाच आता कंटेनरचे भाडे वाढवण्यात आले आहे.
द्राक्ष उत्पादकाला लागणाऱ्या सर्व साहित्यावर जीएसटी आकारणे बंद करावे, अशी मागणी केंद्र सरकारकडे सातत्याने केली असल्याचे भोसले यांनी सांगितले. द्राक्षबागेसाठी लोखंडी मांडव, त्यावरील तारा, औषधे फवारणी आदी साहित्यावर १८ टक्केपेक्षा जास्त कर असल्याचे भोसले म्हणाले.
बांगलादेशात द्राक्ष निर्यातीचे प्रमाण सर्वाधिक आहे, मात्र हा सगळा माल रस्त्याने, मालमोटारीतून जातो. सीमेवर तो दुसऱ्या मालमोटारीत भरावा लागतो. यात मालाचे बरेच नुकसान होते. बांगलादेशात जाण्यासाठी केंद्र सरकारने अलीकडेच एक रेल्वे सुरू केली आहे. या रेल्वेतून द्राक्ष माल नेण्यास परवानगी द्यावी, अशी मागणीही केंद्र सरकारकडे केली आहे. मात्र त्याचीही अद्याप दखल घेतली नसल्याचे भोसले यांनी सांगितले.
चौकट
केंद्राने लक्ष द्यावे
“केंद्र सरकारने द्राक्ष निर्यातदारांच्या मागण्यांकडे प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. निर्यातीमुळे देशालाही परकीय चलन मिळते. निर्यातीचे सर्व निकष पाळताना द्राक्ष बागायतदारांना येणाऱ्या अडचणी सरकारने दूर कराव्यात.”
-राजेंद्र पवार, अध्यक्ष, द्राक्ष बागायतदार संघ