'विहिरीतील पाण्यात दूषित घटक...' आयुक्त म्हणतात,'नाही'
By राजू हिंगे | Updated: January 24, 2025 13:14 IST2025-01-24T13:13:24+5:302025-01-24T13:14:16+5:30
सर्वाधिक बाधित रुग्ण नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरी परिसरातील आहेत

'विहिरीतील पाण्यात दूषित घटक...' आयुक्त म्हणतात,'नाही'
पुणे : शहरात गुईलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस)चे संशयित रुग्ण वाढल्याची गंभीर दखल घेत महापालिकेने संबंधित भागाची पाहणी केली. पुणे महापालिका नांदेड, नांदोशी, किरकिटवाडी, धायरीच्या काही भागांना विहिरीतून विनाप्रक्रिया केलेले पिण्याचे पाणी देत आहे.
नांदेड व बारांगणे मळा येथील विहिरी आणि जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत असा प्राथमिक अहवाल आला आहे. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचे आदेश दिल्याचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले. नांदेड फाट्याजवळ असलेल्या विहिरीची महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी पाहणी केली. यावेळी महापालिकेच्या विघृत, पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाचे अधिकारी हजर होते.
याबाबत आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, सिंहगड रस्ता, नांदेड परिसराची पाहणी केली. सर्वाधिक बाधित रुग्ण याच परिसरातील आहेत. येथील विहिरी व जलस्रोतांमध्ये कोणतेही दूषित घटक आढळलेले नाहीत. मात्र, खबरदारी म्हणून क्लोरिनची दुप्पट मात्रा वापरण्याचे आदेश दिले आहेत.
काही ठिकाणी जलवाहिन्यांशेजारी सांडपाणी साठत असल्याची तक्रार स्थानिकांची आहे. त्यामुळे येथे साचलेले पाणी काढून टाकून आवश्यक तेथे नव्या सांडपाणी वाहिन्या टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य विभागाची ८५ पथके या परिसरात सर्वेक्षण करत आहेत. फक्त ‘फिल्टर’ केलेले पाणी पिण्यासाठी योग्य नसल्याने बाधित रुग्ण आढळलेल्या परिसरातील नागरिकांनी सध्या पाणी उकळून थंड करून प्यावे, अशी सूचना केली आहे. नांदेड व बारांगणे मळा येथील विहिरीतील पाण्याच्या प्राथमिक अहवालात कुठलेही दूषित घटक आढळलेले नाहीत. सविस्तर अहवाल लवकरच प्राप्त होईल, असेही डॉ. राजेंद्र भोसले यांनी सांगितले.
विहिरीला संरक्षक जाळी बसविणार
नांदेड गावातील विहिरीला सरंक्षक जाळी नाही. याकडे नागरिकांनी आयुक्तांचे लक्ष वेधले. त्यावर या विहिरीला तातडीने संरक्षक जाळी बसवून घेण्याच्या व नियमित पाणी तपासणी करण्याच्या सूचना आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या.