दूषित रासायनिक सांडपाणी सोडले शेतात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:09 AM2021-06-05T04:09:32+5:302021-06-05T04:09:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे सोलापुर महामार्गावरील दुषित पाण्याची चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरकुंभ : कुरकुंभ (ता. दौंड) येथील पुणे सोलापुर महामार्गावरील दुषित पाण्याची चारी पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फोडून प्रशासनाने संयुक्त कारवाई करीत सर्व रासायनिक दूषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात व कुरकुंभ गावातील ओढ्यात सोडून दिले. त्यामुळे पहाटे केलेल्या या कारवाईवर शेतकऱ्यांनी व ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
शेतकऱ्यांना विश्वासात न घेता व कुठलाही तोडगा न काढता रासायनिक दुषित पाणी शेतकऱ्यांच्या शेतात सोडून दिल्याने या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पुढचे पाऊल उचलत पाण्याची चारी पुन्हा बुजवण्याचा निश्चय केल्याने गेली तीन महिन्यापासून सुरू असलेले हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
तहसीलदार, प्रांताधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महाराष्ट्र औद्योगीक विकास महामंडळ, सामाईक सांडपाणी प्रक्रिया केंद्र व पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून सुरू झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्या आहेत. दुषित पाणी प्रकल्पातून राजरोसपणे सोडले जात असताना दोषींवर कारवाई करण्याऐवजी शेतकऱ्यांचा, ग्रामस्थांचा विरोध मोडून काढण्याचे काम प्रशासनाने केल्याने याबाबत उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे.
वाहतुकीच्या निर्माण झालेल्या समस्येमुळे रस्ते प्रशासन व तत्सम अधिकाऱ्यांना ही कारवाई करावी लागल्याची माहीती दौंडचे तहसीलदार संजय पाटील यांनी दिली. दुषित पाण्यामुळे शेकडो एकर शेतीचा उपयोग शून्य झाला आहे. पिण्याच्या पाण्याचे स्रोत दुषित झाले आहे. कुठल्याही प्रकारची भरपाई देने तर दूरच उलट दडपशाहीने प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे.
भांडवलशाही धार्जिणे प्रशासन
कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रात सुरू झालेल्या रासायनिक प्रकल्पातून उत्सर्जित होत असलेले वायु प्रदूषण व दुषित पाण्याच्या प्रदूषणाने उच्छाद मांडून गेली वीस वर्षापेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. प्रदूषण करणाऱ्या विविध कंपनी प्रशासनाच्या विरोधात हजारो पुरावे आजवर विविध स्तरावर देण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी बाधित शेतकरी व ग्रामस्थांना कायदा सुव्यस्थेच्या नावाखाली दडपशाहीने गपगार करुन भांडवलशाही समोर नतमस्तक होण्यात धन्यता मानण्याचे काम भांडवलशाही धार्जिणे प्रशासन करीत आहे.
फोटो ओळ : पुणे सोलापूर महामार्गावरील चारी फोडल्यामुळे शेतात रासायनिक दुषित पाण्याचे तळे निर्माण झाले आहे.