पुण्यात दूषित पाणी? महापालिका शोधणार मूळ कारण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 09:52 IST2025-01-30T09:51:32+5:302025-01-30T09:52:03+5:30
पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणा

पुण्यात दूषित पाणी? महापालिका शोधणार मूळ कारण
पुणे : ‘जीबीएस’च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर दूषित पाण्याचा मूळ स्रोत शोधण्यावर महापालिकेने भर दिला आहे. त्यासाठी धरणासह, विहीर, सोसायट्यांच्या टाक्या आणि घरांतूनही पाण्याचे नमुने घेऊन चाचणी केली जाणार आहे. याशिवाय पाणलोट क्षेत्रातील कंपन्या, रिसॉर्ट्स तसेच अन्य ठिकाणचे सांडपाणी कुठे व कसे सोडले जाते, याचीही तपासणी होणार आहे.
पालिका नांदेड आणि बारांगणी मळा येथील विहिरीच्या पाण्याची पुन्हा एकदा तपासणी करण्यात येणार आहे. याशिवाय धरणातील पाणी, गावातील नागरिकांची घरे, सोसायट्यांच्या टाक्या यातूनही प्रातिनिधिक स्वरूपात नमुने घेऊन त्याची चाचणी केली जाईल. यासाठी स्वतंत्र मनुष्यबळ नियुक्त करण्यात आले आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील विविध स्वरूपाच्या कंपन्या, प्रक्रिया प्रकल्प तसेच रिसॉर्ट येथील सांडपाणी कुठे सोडले जाते, त्यावर प्रक्रिया होते का, याचीही पाहणी होणार आहे. काही ठिकाणाहून पाण्यात जड धातू किंवा रसायने, क्षार मिसळले जात आहेत का याचीही तपासणी केली जाईल,’असे पालिकेच्या आरोग्य प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
दूषित अन्न विक्रेत्यावर कारवाई कधी ?
जीबीएसचे रुग्ण दूषित पाण्याबरोबर दूषित अन्न कारणीभूत ठरत आहे. पण या दूषित अन्नपदार्थ विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कारवाई कधी करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नये
महापालिकेने पशुसंवर्धन संचालक, अन्न व औषध प्रशासनाशीही संपर्क साधला आहे. पोल्ट्री व मटण चिकन शॉपचालकांशी संपर्क साधून त्यांना अधिक खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात येत आहेत. कच्चे मांस हाताळले अथवा खाल्ल्यास त्यातून जंतूसंसर्ग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हात स्वच्छ धुतल्याशिवाय मांसाला हात लावू नये, असे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. नीना बोराडे यांनी सांगितले.
तीन रुग्णांवर उपचार सुरू
महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात ‘जीबीएस’चे तीन रुग्ण दाखल आहेत. त्यापैकी दोघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. महापालिकेच्या विनंतीनंतर शहरातील तीन ‘न्यूरोलॉजिस्ट’नी कमला नेहरू रुग्णालयात मानद सेवा पुरविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती डॉ. नीना बोराडे यांनी दिली.
आताच पाणी दूषित कसे झाले?
पुणे महापालिकेमध्ये ही गावे समाविष्ट होण्यापूर्वी नांदेड गावातील विहिरीतून पाणीपुरवठा केला जात आहे. पण आताच या विहिरीचे पाणी दूषित कसे झाले, असा सवाल उपस्थित केला जात आहे. या विहिरीत एखादा प्राणी मृत पडला का किंवा या विहिरीत पाण्याचे क्लोरिन टाकण्यासाठी हलगर्जीपणा झाला का, याविषयी शंका व्यक्त केली जात आहे.