दूषित पाणीपुरवठा; नागरिक हैराण, नगर परिषदेचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 01:51 AM2017-10-24T01:51:04+5:302017-10-24T01:51:13+5:30
लोणावळा : लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात महिनाभरापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे.
लोणावळा : लोणावळा शहर व आजूबाजूच्या ग्रामीण भागात महिनाभरापासून नळाद्वारे दूषित पाणीपुरवठा होत आहे. टाटा कंपनीच्या वलवण धरणांमधून लोणावळा शहर व परिसरातील वाकसई, देवघर, करंडोली, जेवरेवाडी, कार्ला, वेहेरगाव आदी गावांना कार्ला प्रादेशिक पाणी योजनेद्वारे, तसेच कुसगाव, डोंगरगाव परिसरामध्ये पाणीपुरवठा केला जातो. महिनाभरापासून नळाद्वारे येणारे पाणी अतिशय दूषित व दुर्गंधीयुक्त असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत.
नळाद्वारे येणारे पाणी हे पिवळसर रंगाचे असून, त्याचा अक्षरश: गटारीतील पाण्याप्रमाणे घाण वास येत आहे. या दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. घरात पाण्याचे हंडे असो वा बादल्या; पाण्याचा एवढा घाण वास येत आहे.
लोणावळा नगर परिषद, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे पाणीपुरवठा अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता, धरणात शेवाळासारखी वनस्पती वर आल्याने खराब पाणीपुरवठा होत असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, महिनाभरापासून असा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक हैराण आहेत. दर वर्षीपेक्षा या वर्षी जास्त पाऊस झाला. वलवण धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही असे घाण पाणी येत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली.