राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

By Admin | Published: May 29, 2017 01:50 AM2017-05-29T01:50:18+5:302017-05-29T01:50:18+5:30

लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या

Contaminated water supply to Rajgurunagar | राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

राजगुरुनगरला दूषित पाण्याचा पुरवठा

googlenewsNext

राजेंद्र मांजरे/ लोकमत न्यूज नेटवर्क
राजगुरुनगर : लाखो रुपये खर्चून पाणी योजना करूनही राजगुरुनगर शहरवासीयांना दिवसाआड व दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. शुद्ध केलेल्या पाण्यात विहिरीचे शुद्ध न केलेले पाणी मिसळून थेट राजगुरुनगर शहराला ते वितरित होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
राजगुरुनगर नगर परिषदेने पाणीपुरवठ्यासाठी विविध उपाययोजना करूनही, शहराला पुरेसे आणि शुद्ध पाणी देण्यात नियोजनाअभावी नगर परिषद प्रशासनाला अपयश येत आहे. यामुळे नागरिकांवर दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. जुनी पाणी योजना कुचकामी झाल्याने शुद्ध पाण्याच्या पुरवठ्यासाठी जिल्हा नगरोत्थान योजनेतून ८८ लाख रुपयांचे जलशुद्धीकरण केंद्राचे कामही गेल्या वर्षी करण्यात आले होते. या जलशुद्धी केंद्रातून दररोज ३.५ एमएलडी म्हणजे ३५ लाख लिटर शुद्ध पाणी उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले होते. या प्रकल्पातून पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी पूर्वीच्या १५ अश्वशक्तीच्या मोटारींऐवजी ३० अश्वशक्ती क्षमतेच्या मोटारी बसविण्यात आल्या होत्या. या केंद्रापासून वाड्या-वस्त्यांच्या पाण्याच्या टाकीपर्यंत एकूण ७०० मीटर लांबीची आणि ८ इंची जाडीची बिडाची पाइपलाइन टाकण्यात आली होती. या कामासाठी २२ लाख रुपये खर्च केले होते. बंधाऱ्यातील गाळ आणि वाळूही उपसली होती. एवढे सगळे करूनही काही दिवसांपासून शहरातील नागरिकांना कमी दाबाने व दिवसाआड पाणी सोडले जात आहे. राक्षेवाडीचा काही परिसर, पाबळ रोड, पडाळवाडी येथे पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. काही ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो. गळती थांबविण्यासाठी ३५ लाख रुपये निधी दिला होता. व्हॉल्व्ह व इतर साहित्य घेण्यात आले होते. मात्र वर्ष उलटूनही गेले तरी घेतलेले साहित्य धूळ खात पडून आहे. त्यामधील व्हॉल्व्ह व पाइप निकामी झाले आहेत. बंधाऱ्यातील साठलेल्या पाण्यात सांडपाणी मिसळल्यामुळे दूषित होत आहे.

व्हॉल्व्ह झाले नादुरुस्त : पाण्याचा अपव्यय

गेल्या काही दिवसांपासून शुद्धीकरण झालेल्या पाण्यात नदीचे पाणी मिसळून नागरिकांना ते वितरित केले जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


दररोज ५० ते ६० लाख लिटर पाणी शहरातील ६५ हजार नागरिकांना वितरित केले जाते. पालकमंत्र्यांनी ३५ लाख रुपये निधी देऊन शहरात गेल्या वर्षापासून ठिकठिकाणी पाण्याचे वॉल बसविण्यात आले नाही. त्यामुळे पाण्याची गळती होऊन पाणी वाया जात आहे. शहराला १० लाख लिटर जास्तीच्या पाण्याची आवश्यकता आहे. मात्र ते उपलब्ध होत नाही. ३० लाख लिटर पाणी शुद्धीकरण व ३० लाख लिटर नदीलगतच्या विहिरीतील शुद्ध न केलेले पाणी एकत्र मिसळून राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा होत आहे.
- शिवाजी मांदळे (नगरसेवक, राजगुरुनगर नगर परिषद)


राजगुरुनगर शहरात वॉल बसविण्याचे काम अपूर्ण आहे. ते काम लवकरच हाती घेणार असून उन्हाळ्याचे दिवस असल्याने हे काम हाती घेतल्यास चार-पाच दिवस पाणीपुरवठा योजना बंद राहील. त्यामुळे नागरिकांचे हाल नकोत, म्हणून जूनच्या पहिल्या आठवड्यात वॉल बसविण्याच्या कामाला सुरुवात करणार आहे. तसेच जलशुद्धीकरण केलेलेच पाणी शहरातील नागरिकांना पुरविण्यात येते. तसेच बऱ्याच वेळा विजेचा अनियमित असल्यामुळे दिवसाआड पाणी दिले जाते. शुद्ध न केलेले पाणी मिसळत नाही. - सचिन सहस्रबुद्धे (मुख्यधिकारी, राजगुरुनगर नगर परिषद)

राजगुरुनगर शहराला पाणी खराब येते, पण घरात पाण्याचे पाणी शुद्धीकरण यंत्र असल्यामुळे ते लक्षात येत नाही. शहरासाठी कडूस प्रादेशिक पाणीपुरवठा फायद्याची आहे. शहराला जेवढे जलशुद्धीकरण केलेले पाणी लागते ते नगर परिषद देऊ शकत नाही. नगर परिषद फक्त पाणीपुरवठा योजनेची वरवरची डागडुजी करून मलमपट्टी करीत आहे. - ऊर्मिला सांडभोर (नागरिक राजगुरुनगर)

Web Title: Contaminated water supply to Rajgurunagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.