ससाणेनगरमध्ये दूषित पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:11 AM2021-03-22T04:11:35+5:302021-03-22T04:11:35+5:30
ससाणेनगरमध्ये विस्कळीत आणि मैला-मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रासले आहेत. मागील आठवड्यापासून येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढल्या ...
ससाणेनगरमध्ये विस्कळीत आणि मैला-मातीमिश्रित दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक कमालीचे त्रासले आहेत. मागील आठवड्यापासून येथील नागरिकांना आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. पालिका प्रशासनाने तातडीने दखल घेऊन नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा. प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठा केला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे येथील नागरिकांनी सांगितले.
दरवर्षी मार्च-एप्रिलपासून ससाणेनगर परिसरातील नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आरोग्याच्या समस्या भेडसावतात. मागील अनेक वर्षांपासून वारंवार पाणीपुरवठा विभागाकडे नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, यासाठी स्थानिक नागरिकांनी हडपसर क्षेत्रीय कार्यालयातील पाणीपुरवठा विभागासह महापालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारी दिली आहे. त्यासाठी आंदोलनही केले आहे. मात्र, अद्याप त्याची दखल का घेतली जात नाही, असा संतप्त स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.
ससाणेनगरमधील नागरिकांनी सांगितले की, मागील आठवडाभरापासून पिण्याचे पाणी वेळेवर येत नाही. या परिसरातील सोसायट्या आणि गल्ल्यांमधील नागरिकांना नळाद्वारे मातीमिश्रित दूषित पाणी येत आहे. सुरुवातीला आलेल्या पाण्याचा दुर्गंधीयुक्त वास येतो. दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की, पाण्याची ही परिस्थिती असते. दूषित पाण्यामुळे नागरिकांना साथीच्या आजाराला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षापासून नागरिकांमध्ये कोरोनाची भीती आहे. सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.