आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी असे समजून "कंटेन्मेन्ट" भागातील नागरिकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2020 05:37 PM2020-05-04T17:37:02+5:302020-05-04T17:38:20+5:30

शहरातील जवळपास 69 ठिकाणे ही अतिसंक्रमणशील म्हणून घोषित

Contenment areas people crowd from Understand that you are also allowed to exit | आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी असे समजून "कंटेन्मेन्ट" भागातील नागरिकांची गर्दी

आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी असे समजून "कंटेन्मेन्ट" भागातील नागरिकांची गर्दी

Next
ठळक मुद्देकंटेन्मेन्ट भागात बँकेत, पेट्रोलपंप, किराणा मालाची दुकाने याठिकाणी गर्दी

पुणे :  कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहण्यासाठी एकीकडे राज्य प्रशासन आणि पोलीस प्रशासन शर्थीचे प्रयत्न करत आहे. दुसरीकडे अद्याप नागरिकांमध्ये परिस्थितीचे गांभीर्य नसल्याचे दिसून आले आहे. रविवारी रात्री उशिरा कोरोना संक्रमणशील भाग वगळता बाकीच्या भागातील सर्व व्यवहार सुरु करण्याचे आदेश पालिका प्रशासनने दिले. मात्र,  कंटेन्मेन्ट भागात या निर्णयाचे उल्लंघन झाल्याचे चित्र सोमवारी पाहवयास मिळाले. इतरांप्रमाणेच आपल्याला देखील बाहेर पडण्याची परवानगी दिली आहे असे समजून या भागातील नागरिकांनी मोठ्या संख्येने बँकेत, पेट्रोलपंप, किराणा मालाची दुकाने याठिकाणी गर्दी केली होती. 
  शहरातील जवळपास 69 ठिकाणे ही अतिसंक्रमणशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. यात प्रामुख्याने शहरातील मध्यवस्तीचा भाग, प्रमुख पेठा तसेच कोंढवा, मुंढवा, घोरपडी, लडकतवाडी, ढोले पाटील रस्ता, पुणे स्टेशनचा परिसर, ताडीवाला रोड, यांचा समावेश आहे. संक्रमणशील भाग वगळता इतर भागातील सेवा अंशत: सुरु करण्यात येतील असे पालिका प्रशासनने सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवशी शहरातील या भागात नागरिकांची वर्दळ वाढली. मोठ्या संख्येने वाहनांची रहदारी वाढल्याचे दृश्य पाहवयास मिळाले. जीवनावश्यक वस्तुंची विक्री करणारी दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली होती. असे असले तरी नागरिकांची वाढलेली गर्दी चिंतेचा विषय ठरली. लष्कर परिसरात काही ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले. नागरिक शिस्तीचे पालन करुन योग्य अंतर ठेवून किराणा मालाच्या दुकानाबाहेर उभे होते. पेट्रोलपंपावर देखील केवळ जीवनावश्यक सेवा वगळता अन्य कुणाला पेट्रोल दिले जात नव्हते. शहराचा इतर भाग सुरु  असल्याने त्यात आपल्याही भागाचा समावेश केला आहे असा अनेकांचा समज झाल्याने अनेकजण घराच्या बाहेर पडले. विशेषत: अशा नागरिकांनी पेट्रोल भरण्यासाठी गर्दी केली होती. यासगळयात बहुतांशी नागरिकांनी बँकांच्या बाहेर लांब रांगा लावल्या होत्या. कँम्पातील वेगवेगळया बेक-यांबाहेर देखील नागरिक मोठ्या संख्येने उभे असल्याचे दिसून आले. 

* सोमवार पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, रास्ता पेठ याबरोबरच एम जी रोड,  बाबाजान चौक, गोळीबार मैदान, मंगळवार पेठ, ताडीवाला रस्ता, हा भाग कोरोना अतिसंक्रमनशील भाग म्हणून घोषित करण्यात आला आहे. सोमवारी शहरातील इतर भागात दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली असताना मात्र या भागात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. जीवनावश्यक व आरोग्यविषयक महत्वाच्या सेवा वगळता अन्य कुठलीही सेवा सुरु या भागात सुरु नव्हती. सध्या शहरात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण या भागातून असून तेथील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत.

Web Title: Contenment areas people crowd from Understand that you are also allowed to exit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.