व्यापाऱ्यांकडून कडत्याची मागणी कायम

By Admin | Published: November 27, 2015 01:34 AM2015-11-27T01:34:42+5:302015-11-27T01:34:42+5:30

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्रामध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी कडता द्यावा, यासाठी उपबाजार केंद्रातील व्यापाऱ्यांनी माल खरेदी थांबविली होती़

Continued demand from traders | व्यापाऱ्यांकडून कडत्याची मागणी कायम

व्यापाऱ्यांकडून कडत्याची मागणी कायम

googlenewsNext

नारायणगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील उपकेंद्रामध्ये भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी कडता द्यावा, यासाठी उपबाजार केंद्रातील व्यापाऱ्यांनी माल खरेदी थांबविली होती़ अखेर याच्यात बाजार समितीने हस्तक्षेप केल्याने कडता हा विषय तात्पुरता थांबला आहे़ परंतु व्यापाऱ्यांनी शेकडा दहा जुडी कडता द्यावा, ही मागणी कायम ठेवली आहे़
धना, मेथी व शापू या भाजीपाल्यासाठी नारायणगाव उपबाजार केंद्र हे जुन्नर-आंबेगाव-खेड तालुक्यांतील मोठी बाजारपेठ आहे़ याठिकाणी सर्वाधिक खरेदी-विक्री केली जाते़ नुकतेच जुन्नर, आंबेगाव व खेड या बाजार समितीच्या सभापती व संचालक मंडळाची बैठक नारायणगाव येथे पार पडली होती़ या बैठकीत शेतकऱ्यांकडून घेण्यात येणारा कडता पध्दत म्हणजेच शेकडा जुडीमागे दहा जुडी कडता म्हणून व्यापाऱ्यांना दयावा लागत होता़ ही कडता पध्दत सर्व बाजार समितींनी निर्णय घेऊन बंद पाडली़ त्यानंतरही व्यापारी शेतकऱ्यांकडून पाच जुडी कडता म्हणून घेत होते़ परंतु दहा जुडीच कडता मिळावा अशी मागणी व्यापाऱ्यांची होती. काल (दि़२५) रोजी सायंकाळी ७.३० वा़चे सुमारास धना, मेथी घेऊन आलेल्या शेतकऱ्यांनी दहा जुडी कडता दयावा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली़ या मागणीस शेतकऱ्यांनी विरोध केल्याने भाजीपाल्याची खरेदी-विक्री थांबली होती़ शेतकरी व व्यापारी यांचा संघर्ष टोकाला जाऊन वाद मिटेना अशी परिस्थिती निर्माण झाली होती़ अखेर बाजार समितीचे उपबाजार केंद्राचे व्यवस्थापक शरद धोंगडे यांनी हस्तक्षेप केल्यानंतर भाजीपाला खरेदी-विक्रीस व्यापाऱ्यांनी सुरूवात केली. काल रात्री उशिरापर्यंत ३ लाख जुडयांची आवक झाली़ अशी माहिती धोंगडे यांनी दिली़
दरम्यान, शेतकऱ्यांशी चर्चा केली असता, ते म्हणाले की, कडता पध्दत पणन महासंघाच्या आदेशनुसार बाजार समितीने एक वर्षापासून बंद करूनही व्यापारी पाच ते दहा टक्के कडता घेत आहेत़ बाजारभाव कमी असल्याने शेतकऱ्यांचा ने-आण चा खर्च देखील वसुल होत नाही़ त्यामुळे कडता पध्दत बंद व्हावी अशी प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली़
तिनही बाजार समितीच्या बैठकीनंतर कडता पध्दत बंद करण्याचा निर्णय झाला असला तरी प्रत्यक्षात शेकडा पाच जुडी अशी कडता पध्दत सुरू आहे़ शेतकरी व व्यापारी यांच्या समन्वयाने ही कडता पध्दत चालू ठेवण्यात आली आहे़ अशी माहीती एका व्यापाऱ्याने दिली़

Web Title: Continued demand from traders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.