औषधोपचार सुरूच; रुग्णसंख्या साडेसहा हजारांवर, आळंदीत डोळ्यांची साथ आटोक्यात येईना
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2023 06:39 PM2023-07-23T18:39:03+5:302023-07-23T18:39:52+5:30
आळंदी शहरात सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली
आळंदी: तीर्थक्षेत्र आळंदीत वातावरणातील बदलामुळे मुलांना उद्भवलेली डोळे येण्याची साथ आटोक्यात येत नाही. मागील आठ दिवसांत सुमारे साडेसहा हजारांहून अधिक शाळकरी मुलांना या साथीच्या आजाराला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान प्रारंभीच्या दिवसात ज्या मुलांचे डोळे आले होते, त्यांच्यात उपचारानंतर बऱ्यापैकी सुधारणा झाल्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंदिरा पारखे यांनी सांगितले.
आळंदी शहरात सहा ते सोळा वर्ष वयोगटातील मुला - मुलींचे डोळे येण्याची साथ पसरली आहे. यापार्श्वभूमीवर तालुका आरोग्य प्रशासन व आळंदी ग्रामीण रुग्णालय अलर्ट झाले असून आठ दिवसांपासून आवश्यक त्या उपाययोजना करत आहे. आळंदी व्यतिरिक्त तालुक्यातील इतर ग्रामीण रुग्णालयांतंर्गत असलेल्या गावांमधील शाळा, आश्रमशाळा, अंगणवाडीतील मुलांचा सर्व्हे करण्यात आला आहे. विशेषतः सद्यस्थितीत आळंदीत राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रम अंतर्गत दहा पेक्षा अधिक पथके कार्यरत आहेत. शहरातील विविध ठिकाणी असणाऱ्या संस्थेमध्ये जाऊन मुलांची तपासणी केली जात आहे. डोळ्यांची लागण झालेल्या मुलांना तात्काळ औषधे देण्यात येत आहेत. आजपर्यंत १९ हजार ६६८ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान सोमवार ते शुक्रवारपर्यंत डोळे लागण झालेल्या रुग्णांची संख्या अडीच हजार होती. मात्र शनिवारी (दि.२२) पुन्हा २ हजार ९४ तर रविवारी १ हजार ४८२ रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे आळंदी शहर व परिसरात एकूण रुग्ण संख्या ६ हजार ४०३ इतकी झाली आहे. यापार्श्वभूमीवर रविवारी (दि.२३) आळंदी शहरातील वारकरी शिक्षण संस्थेच्या चालक तथा प्रमुखांची रुग्णालयात एकत्रित बैठक घेण्यात आली. वाढत्या आजारासंदर्भात आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
उपचारानंतर सात ते आठ दिवसांत हा आजार बरा होऊ शकतो
प्रारंभी ६ ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना मोठ्या प्रमाणात हा संसर्ग झाला होता. मात्र आता त्या पुढील वयोगटातही संसर्ग होत असल्याचे निदर्शनास येत आहे. कोरोनासारखा हा आजार नसल्याने पालकांनी घाबरून जाऊ नये. उपचारानंतर सात ते आठ दिवसांत हा आजार बरा होऊ शकतो. मात्र आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन माहिती वैद्यकीय अधिक्षक डॉ. उर्मिला शिंदे यांनी केले आहे.
आळंदीव्यतिरिक्त इतर गावातही सर्व्हे सुरु
आळंदी ग्रामीण रुग्णालयात एनआयव्हीचे सिव्हिल सर्जन तपासणी पथकाद्वारे बाधित मुलांची तपासणी करून त्यावर उपचार केले जात आहेत. तर रुग्णालयात दोन नेत्रतज्ज्ञांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. आळंदी व्यतिरिक्त इतरही गावांमध्ये वैद्यकीय पथकांनी मुलांचा सर्व्हे केला असून डोळे आलेल्यांवर आवश्यक उपचार केले आहेत.