सतत सिटी स्कॅन, स्टेरॉइडचा अतिवापर रुग्णासाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:15 AM2021-05-05T04:15:38+5:302021-05-05T04:15:38+5:30
पुणे: कोरोना रुग्णांचे सतत सिटी स्कॅन करणे, त्यांना स्टेरॉइड देण्याचे प्रकार वाढत चालले असून, त्याचे रुग्णांवर अनिष्ट परिणाम दिसू ...
पुणे: कोरोना रुग्णांचे सतत सिटी स्कॅन करणे, त्यांना स्टेरॉइड देण्याचे प्रकार वाढत चालले असून, त्याचे रुग्णांवर अनिष्ट परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळेच केंद्रीय कोरोना टास्क फोर्सने या दोन्हींचा अतिवापर टाळण्याचे आवाहन डॉक्टरांना केले आहे. राज्य टास्क फोर्सनेही याला दुजोरा दिला आहे.
एक सिटी स्कॅन म्हणजे रुग्णाचे ३०० एक्स-रे काढण्यासारखे आहे. त्यातून रेडिएशन होते. ही किरणे रुग्णासाठी घातक असतात.
राज्याचे माजी आरोग्य संचालक व राज्य कोरोना टास्क फोर्सचे सदस्य डॉ. सुभाष साळुंखे यांनी याला दुजोरा दिला. कोरोना रुग्ण आला की त्याचे लगेच सिटी स्कॅन करू नका, याचा समावेश आम्ही अगदी सुरुवातीपासून कोरोना उपचार मार्गदर्शक सूचनांमध्ये केला, तो याच कारणांमुळे, स्टेरॉइडसही अगदीच आवश्यक असली तर द्यावीत, असे डॉ. साळुंखे म्हणाले.
इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे माजी अध्यक्ष व अतिदक्षता विभाग तज्ज्ञ डॉ. सुभाल दीक्षित म्हणालज्की, टास्क फोर्सचे आवाहन योग्यच आहे. सिटी स्कॅनमुळे फुफ्फुसाला किती संसर्ग झाला आहे हे समजतेफ्रुग्ण अत्यवस्थ असेल तर दाखल झाल्याच्या पहिल्या दिवशी व नंतर फरक पडला की नाही, हे समजण्यासाठी पाचव्या दिवशी सिटी स्कॅन करणे योग्य असते. त्याच्या मध्ये अगदीच गरज पडली तर करावे, पण सतत सिटी स्कॅन करणे धोकादायकच आहे. सध्या रुग्णांचे नातेवाईक धास्तावलेले असतात व ते डॉक्टर असल्याप्रमाणे आग्रह धरतात. डॉक्टरांचे कर्तव्य आहे की त्यांनी या दबावाला बळी न पडता रुग्णाची गरज काय हे लक्षात घ्यावे व निर्णय घ्यावा. स्टेरॉइडबाबतही हेच करावे असे मत डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केले.
-------------
तीनच गोष्टी रुग्णांसाठी आवश्यक
स्टेरॉइड, ब्लड थिनर व ऑक्सिजन या तीनच गोष्टी सध्या कोरोना रुग्णासाठी लाईफ सेव्हर आहेत, मात्र त्यांचा वापर फारच तीव्र आवश्यकता असेल, तरच करण्याची गरज आहे. ही गरज डॉक्टरांना बरोबर कळते, रुग्णाच्या नातेवाईकांनी कोणाचे तरी ऐकून त्याचा आग्रह धरू नये व डॉक्टरांनीही कोणत्याही दबावात न येता याचा वापर शक्यतो टाळावा व फारच टोकाची गरज असेल तेव्हाच करावा, असे आवाहन डॉ. साळुंखे यांनी केले. या तिन्हीचा अती व प्रामुख्याने अनावश्यक वापर रुग्णासाठी घातक किंवा पुढे अनिष्ट परिणाम दाखवणारा ठरू शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.