Rain Update: लोणावळ्यात पावसाची संततधार कायम; दहा दिवसात शहरात १५५३ मिलिमीटर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 17:59 IST2023-07-27T17:58:28+5:302023-07-27T17:59:34+5:30
गेल्या दहा दिवसांत १८ ते २७ जुलै दरम्यान शहरात तब्बल १५५३ मिलिमीटर पाऊस झाला असून यावर्षीच्या हंगामात २८६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे...

Rain Update: लोणावळ्यात पावसाची संततधार कायम; दहा दिवसात शहरात १५५३ मिलिमीटर पाऊस
लोणावळा (पुणे) : लोणावळा शहरात मागील दहा दिवसांपासून सुरू असलेली पावसाची संततधार आजदेखील कायम आहे. मुंबई व उपनगरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने त्याचा परिणाम घाटमाथ्यावरील लोणावळा खंडाळा या शहरांवर देखील झाला आहे. दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. गेल्या दहा दिवसांत १८ ते २७ जुलै दरम्यान शहरात तब्बल १५५३ मिलिमीटर पाऊस झाला असून यावर्षीच्या हंगामात २८६५ मिलिमीटर पाऊस झाला आहे.
पावसाची संततधार कायम असली तरी जोर कमी जास्त होत असल्याने पाणी साचण्याचे प्रमाण नगण्य आहे. पावसामुळे लोणावळा धरण मात्र ८८ टक्के भरले आहे. पावसाचा जोर वाढल्यास हे धरण पूर्ण क्षमतेने भरून धरणाच्या सांडव्यावरून इंद्रायणी नदीमध्ये पाणी येण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे व काळजी घ्यावी, असे आवाहन टाटा पाॅवर कंपनी व लोणावळा नगरपरिषद यांनी नागरिकांना केले आहे.
लोणावळा धरण हे लहान आकाराचे असून त्याला पाणी सोडण्यासाठी दरवाजे नसल्यामुळे धरण भरले की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहण्यास सुरुवात होते. या धरणामधून डक्ट लाईनच्या माध्यमातून खोपोली भागात पाणी सोडले जाते. सध्या पावसाची संततधार सुरू असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक बाहेर जाणाऱ्या पाण्यापेक्षा जास्त असल्याने धरणातील पाणीसाठा वाढू लागला आहे.