ससूनमधील १०० कर्मचाऱ्यांचा करार २ दिवसांत संपणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:15 AM2021-02-26T04:15:37+5:302021-02-26T04:15:37+5:30
पुणे : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे ...
पुणे : फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. ससून सर्वोपचार रुग्णालयात दररोज दाखल होणाऱ्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे प्रमाण मोठे आहे. कोरोना वाढत असतानाच आता ससूनमधील सुमारे १०० कर्मचाऱ्यांचा करार २८ फेब्रुवारीला संपुष्टात येणार आहे. यामुळे कोरोनाकाळात कार्यरत मनुष्यबळाची कमतरता भासण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
मार्च २०२० पासून पुण्यासह महाराष्ट्रात कोरोनाने डोके वर काढायला सुरुवात केली. ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत कोरोनाचा उद्रेक सर्वांनीच अनुभवला. ससून सर्वोपचार रुग्णालयात कोरोना रुग्णांसाठी स्वतंत्र इमारतीत उपचार सुरु करण्यात आले. ससूनमध्ये गंभीर रुग्ण दाखल होण्याचे प्रमाणही मोठे होते. कोरोनाची लाट आता पुन्हा येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. ससूनमधील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करत कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार केले. गेल्या ११ महिन्यांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. असे असतानाच २८ फेब्रुवारीला सुमारे १०० जणांचा करार संपतो आहे.
ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, “२८ फेब्रुवारीला सुमारे १०० डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचा करार संपुष्टात येत आहे. त्याबाबतची बैठक गुरुवारी झाली. करार संपण्याच्या दुसऱ्याच दिवशी नवीन कर्मचारी रुजू होणार असल्याने मनुष्यबळाची कमतरता भासणार नाही.”