पीएमपीच्या ठेकेदारीवरील कर्मचाऱ्यांचा संप
By admin | Published: March 31, 2015 05:30 AM2015-03-31T05:30:04+5:302015-03-31T05:30:04+5:30
पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) खासगी बसगाड्या पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या कंत्राटी कामगारांनी काही मागण्यांसाठी सोमवारी लाक्षणिक संप केला.
पिंपरी : पुणे महानगर परिवहन महामंडळाला (पीएमपीएमएल) खासगी बसगाड्या पुरविणाऱ्या ठेकेदारांच्या कंत्राटी कामगारांनी काही मागण्यांसाठी सोमवारी लाक्षणिक संप केला. स्वारगेट येथील पीएमपीच्या मुख्य इमारतीसमोर कामगारांनी उपोषण केले. ठेकेदारांपैकी काही ठेकेदारांच्या विरोधात कामगारांनी हा संप पुकारला होता. संपाचा बससेवेवर कोणताही परिणाम झाला नाही, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
पीएमपीमध्ये सुमारे १६०० कंत्राटी कामगार आहेत. त्यापैकी ४०० कर्मचारी निगडी, पिंपरी व भोसरी या डेपोमध्ये ठेकेतत्त्वावर काम करतात. यातील ७० टक्के कामगार या संपामध्ये सहभागी झाले होते. कंत्राटी चालक कामावर न आल्याने खासगी बसगाड्यांवर पीएमपीचे चालक पाठवून बस मार्गांवर सोडण्यात आल्या, असे तीनही आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
पीएमपी कामगारांप्रमाणे वेतन मिळावे, साप्ताहिक पगारी रजा मिळावी, वेतन चिठ्ठी व
ओळखपत्र मिळावे, पीएमपी कामगारांप्रमाणे इतर सर्व सुविधा मिळाव्यात, या मागण्यांसाठी संप करण्यात आल्याचे महाराष्ट्र कामगार मंचाचे अध्यक्ष दिलीप मोहिते
यांनी सांगितले. (प्रतिनिधी)