संरक्षण उद्योगातही कंत्राटी कामगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2015 05:08 AM2015-05-07T05:08:03+5:302015-05-07T05:08:03+5:30
बंदूकधारी जवानांचा चारीबाजूने कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. मात्र, या उद्योगात कंत्राटी आणि ‘आऊटसोसींग वर्क’ची पद्धत वाढीस लागली आहे. ‘
मिलिंद कांबळे, पिंपरी
लष्कराच्या संरक्षण उद्योग क्षेत्रात अधिक सुरक्षितता बाळगत उत्पादन केले जाते. येथील कोणतीही माहिती आणि वस्तू बाहेर जाऊ नये म्हणून विशेष दक्षता घेतली जाते. बंदूकधारी जवानांचा चारीबाजूने कडेकोट बंदोबस्त तैनात असतो. मात्र, या उद्योगात कंत्राटी आणि ‘आऊटसोसींग वर्क’ची पद्धत वाढीस लागली आहे. ‘आओ जावो घर तुम्हारा’ या पद्धतीने ये- जा करणाऱ्या कंत्राटी कामगारांची संख्या या उद्योगात वाढत आहे. यामुळे संरक्षण क्षेत्राची सुरक्षा अभेद्य राहिलेली नसल्याचे धक्कादायक चित्र आहे.
खासगी, महापालिका, शासकीय क्षेत्रात खासगी कामगारांची संख्या लक्षणीय वाढली आहे. कायम कामगारांपेक्षा तब्बल तिप्पटीने कंत्राटी कामगार एमआयडीसीत घाम गाळत आहेत. याच पद्धतीने संरक्षण उद्योगात कंत्राटी पद्धतीने शिरकाव केला आहे. गेल्या ७ ते ८ वर्षांपासून हळूहळू आऊटसोसींग आणि कंत्राटी कामगार नियुक्तीची पद्धत वाढत आहे. लष्करी संरक्षण उत्पादन विभागात वर्कशॉप, डेपो, आॅर्डनन्स फॅक्टरी, प्रयोगशाळा असा वेगवेगळ्या आस्थापना पुणे आणि परिसरात आहेत.
तुंटपुज्या वेतनावर मिळेल त्या लोक घेऊन ठेकेदार कंत्राटी कामगार पुरवितो. साफसफाई, गवत काढणे, फांद्या छाटणे, बांधकाम पाडणे, साहित्यांची ने- आण करणे आदीसह विविध कामांसाठी कंत्राटी अकुशल कामगार नेमले जातात.
कामगार नेमताना प्रत्येकाचे संबंधित पोलीस ठाण्याचे ना हरकत प्रमाणपत्र देणे बंधनकारक आहे. मात्र, ठेकेदार १०० रुपयांच्या प्रतिज्ञापत्र परस्पर देऊन मोकळा होतो. यामुळे कामगार कुठले आहेत. त्याची पार्श्वभूमी काय हे समजत नाही. त्यांना आस्थापनाकडून ओळखपत्र (बिल्ला) दिले जाते. एकदा ओळखपत्र मिळाले की, ते कोणत्याही वेळेत ये- जा करतात.
वरिष्ठ अधिकाऱ्यांचा कक्ष तसेच, उत्पादन विभागात त्यांना थेट प्रवेश मिळतो. ठेकेदाराचा रुबाब तर वेगळाच असतो. त्याला आस्थापनाचे प्रवेशद्वार कायम खुले असते. एकाद्या अधिकाऱ्यांच्या अविर्भावात तो सर्वत्र वावरत असतो. कंत्राटी कामगारांकडून सुरक्षा आणि दक्षतेकडे दुर्लक्ष होते. सामानाची चोरीचे प्रकार त्यांच्याकडून अनेकदा घडले आहेत. बिडी पिण्यास बंदी असतानाही ते हे साहित्य आतमध्ये नेतात. या प्रकारे लपून नेलेली बिडी ओढून झाल्यानंतर टाकल्याने गवताने पेट घेतला होता. त्यामुळे आग पेटली. मात्र, इतर कामगारांच्या दक्षतेमुळे आग आटोक्यात आणली गेली. हा प्रकार दीड वर्षांपूर्वी अॅम्युनिशन फॅक्टरीत घडला होता.
या संदर्भात अधिकारी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून मोकळे होतात. आर्थिक संबंधाच्या बळावर ठेकेदार पुढील कारवाई रोखतो. कारवाई न झाल्याने निर्ढावलेले ठेकेदार पुन्हा बिनदास्तपणे काम करतात. ई- टेडरींगमध्येही ठराविक ठेकेदारांना पुन्हा पुन्हा काम मिळते. त्यामुळे ठेकेदार कायम राहतो.
कंत्राटी कामगारांमुळे संरक्षण उद्योगाची सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कायम कामगारांशिवाय प्रवेश नसताना हे कामगार येत असल्याने तेथील माहिती सहजपणे बाहेर पडू शकते. त्याचा गैरफायदा काही अप्रवृत्ती घेऊ शकतात. तरीही ठेकेदारी आणि आऊटसोसींगची पद्धत या उद्योगात वाढत आहे. भविष्यात ही संख्या अधिक वाढण्याची दाट शक्यता आहे.
कंत्राटी कामगारांना कायम करावे
तात्पुरत्या, अल्प मुदतीच्या कामासाठी कंत्राटी कामगार नेमले जातात. मात्र, अखंडीत कामासाठी कायमस्वरुपी कामगाराचे नियुक्त केले जावेत. कंत्राटी कामगार पद्धत संरक्षण उद्योगात नसावी. अकुशल कंत्राटी कामगार नेमल्यास त्याला पुढे कायम केले जावे. सुरक्षेच्या दृष्टिने या कामगारांना पोलीस ना हरकत पत्राच्या सक्तीचे काटेकोरपणे अमलंबजावणी झाली पाहिजे.
- मोहन होळ, खजिनदार, आॅल इंडिया डिफेन्स एम्प्लॉइज फेडरेशन.
शहानिशा होणे गरजेचे
संरक्षण उद्योगात कंत्राटी आणि आउटसोसींग हळूहळू वाढत आहे. आॅर्डनन्स फॅक्टरीत १० ते १५ टक्के, डीआरडीमध्ये ४० टक्के इतके सर्वांधिक आउटसोसींग होत आहे. या उद्योगाची सुरक्षा महत्वाची आहे. तेथे कंत्राटी कामगार नसावेत. या संदर्भात संरक्षण मंत्र्यांना नुकतेच निवेदन दिले आहे. पोलिसांचे ना हरकत घेतले जात नाही, असा कामगारांची पुर्ण पोलीस यंत्रणेमार्फत पुर्ण शहानिशा करुनच नेमणूक केली जावी.
- संजय मेनकुदळे, सहसचिव- भारतीय प्रतिरक्षा मजदूर संघ