आमदार योगेश टिळेकरांचा संपर्क प्रमुखच महापालिकेच्या कचरा प्रकल्पांचे ठेकेदार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2018 08:51 PM2018-11-02T20:51:52+5:302018-11-02T20:58:01+5:30
नागरिकांचा प्रचंड विरोध असताना आमदारांच्या कृपेनेच हडपसरमध्ये नव्याने कचरा प्रकल्प येत असल्याचा आरोप मनसचे गटनेते वसंत मोरे यांनी केला.
पुणे : भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालयीन संपर्क प्रमुख आनंद देशमुख हेच महापालिकेच्या रामटेकडी येथील भुमी ग्रीन एनर्जी या कच-यापासून खतनिर्मिती प्रकल्पामध्ये प्रमुख भागीदार आहेत. आमदारांकडे असलेली एमएच १२ एनसी ००७८ या क्रमांकाची इन्होव्हा क्रीस्टा ही अलीशान मोटार देखील या भुमी ग्रीन एनजीर्चे संचालक विजय टिळेकर यांनी खरेदी केली आहे. नागरिकांचा प्रचंड विरोध असताना आमदारांच्या कृपेनेच हडपसरमध्ये नव्याने कचरा प्रकल्प येत असल्याचा आरोप मनसचे गटनेते वसंत मोरे यांनी केला. त्यामुळे देशमुख याच्या हडपसर येथील कॅनरा बँक खात्यांची चौकशी करावी, अशी मागणी देखील मोरे यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.मर्सिडीझनंतर आमदारांची इनोव्हा क्रिस्टा वादात सापडली असून कचरा प्रकल्पात आमदारांचा संपर्क कार्यालय प्रमुख आनंद देशमुख यांच्या चेहरा पुढे करून कोट्यवधी रुपयांची कमाई आमदार टिळेकर यांनी केलेली असल्याचा आरोप देखील यावेळी मोरे यांनी केला.
महापालिका भवन येथे झालेल्या या पत्रकार परिषदेस मनसेचे नगरसेवक साईनाथ बाबर उपस्थित होते. मोरे यांनी सांगितले, की डिसेंबर २०१५ मध्ये अजिंक्य बायोफोर्ट या कंपनीने त्यांचा रामटेकडी येथील कच-यापासून खत तयार करण्याचा प्रकल्प भुमी ग्रीन एनर्जी कंपनीला हस्तांतरीत करण्यात आला. यानंतर दुस-याच दिवशी भुमी ग्रीन एनजीर्ने तीन संचालकांचे भागीदार पत्र तयार केले. त्यामध्ये विजय टिळेकर, पंकज पासलकर आणि आनंद सुरेश देशमुख हे तिघे समान हक्काचे संचालक आहेत. भुमी ग्रीन कंपनीच्यावतीने हडपसर आणि वडगाव बुद्रुक येथे चालणा-या प्रकल्पातील कामापोटी महापालिकेकडून आता पर्यंत १० कोटी ५० लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली आहेत. आनंद देशमुख हे आमदार योगेश टिळेकर यांचे कार्यालय संपर्क प्रमुख आहेत. त्यामुळे आनंद देशमुख व भुमी ग्रीन एनर्जी यांच्या हडपसर मगरपट्टा कॅनरा बँक शाखेतील खात्यावरून होणा-या सर्व रकमांचे व्यवहार तपासण्यात यावेत.
याशिवाय आमदार टिळेकर हे मागील दोन वर्षांपासून वापरत असलेली एनोव्हा क्रिस्टा ही गाडी २६ मे २०१६ रोजी भुमि ग्रीन एनजीर्चे संचालक विजय टिळेकर यांच्या नावावर खरेदी करण्यात आली आहे. या गाडीवर भाजप युवा मोर्चा प्रदेशअध्यक्ष आमदार योगेश टिळेकर अशी नेमप्लेटही लावण्यात आली आहे. आमदार योगेश टिळेकर यांनी भुमी ग्रीन या कंपनीस रामटेकडी आणि वडगाव बुद्रुक येथील प्रकल्पांचे काम घेउन दिले आहे. त्या बदल्यात भुमि ग्रीन कंपनीने त्यांना सुमारे २६ लाख रुपये किंमतीची मोटार भेट दिली. भुमि ग्रीन कंपनीने १ सप्टेंबरला या गाडीचे सुमारे ९ लाखांचे कर्ज एकरकमी फेडले. यानंतर कागदपत्रांचे सोपस्कार पुर्ण करत ही गाडी आमदार टिळेकर यांचे धाकटे बंधू चेतन टिळेकर यांच्या नावे करण्यात आली आहे. याचे सर्व कागदोपत्री छायाचित्र आणि फेसबुकवरील छायाचित्रांच्या प्रतिही वसंत मोरे यांनी यावेळी पत्रकारांना दाखविल्या.येवलेवाडी विकास आराखड्यातील आरक्षण उठविण्याच्या बदल्यात आमदार योगेश टिळेकर यांनी बांधकाम व्यावसायीकाकडून मर्सिडीज बेंज ही तब्बल एक कोटी किंमतीची महागडी गाडीचे प्रकरण उघडकीस आणले होते.
कंपनी चुकीच काम करत असेल तर आरोप करावे - आमदार योगेश टिळेकर
भुमी ग्रीन एनर्जी कंपनीच्या माध्यमातून शहरातील कच-यांची विल्हेवाट लावण्याचे चांगले काम सुरु आहे. कंपनीच्या कामाचे कौतुक राष्ट्रीय प्रदुषण मंडळाने देखील केले आहे. या कंपनीमध्ये विजय टिळेकर हे आमचे एक भाऊबंद भागीदार आहेत. आनंद देशमुख हा देखील कार्यकर्ता आहे.कंपनीने कोणासोबत भागीदारी करावी, हा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. तसेच भाऊबंदामध्ये आम्ही व्यावहार करावे किंवा नाही हा आमचा प्रश्न आहे. कंपनी काही चुकीचे काम करत असेल, महापालिकेची लुट करत असेल तर फसवणुक केली म्हणता येईल. त्यामुळे वसंत मोरे यांनी केलेल्या आरोपामध्ये काही तथ्य नाही.