पुण्यात ठेकेदाराचा डांबरटपणा, डांबर न टाकताच बुजवत आहेत खड्डे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2022 02:01 PM2022-01-26T14:01:48+5:302022-01-26T15:51:11+5:30

टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत.

Contractor's asphalt in Pune, roads are paved without asphalting | पुण्यात ठेकेदाराचा डांबरटपणा, डांबर न टाकताच बुजवत आहेत खड्डे

पुण्यात ठेकेदाराचा डांबरटपणा, डांबर न टाकताच बुजवत आहेत खड्डे

Next

तन्मय ठोंबरे
पुणे : मध्यवर्ती भागातील अनेक रस्त्यांची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे नागरिकांना मात्र मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, धुळीचा सामनाही करावा लागत आहे. ही कामे अतिशय निकृष्ट दर्जाची होत असल्याचे खंडाेजीबाबा चौकात उघडकीस आले. ‘लोकमत’ पाहणीत हा सारा ‘कारभार’ समोर आला आहे.

टिळक रस्ता, लक्ष्मी रस्ता, खंडोजीबाबा चौक आदी ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत. लॉकडाऊनमध्ये झालेली कामे देखील तशीच आहेत. ती पूर्ण करण्यात आली नाहीत. त्यामुळे रस्त्यांवर खड्डेचखड्डे पहायला मिळत आहेत. चांगला असलेला टिळक रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाला आहे. जलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदला होता. जलवाहिनी टाकल्यावर मात्र तो पूर्वीसारखा तयार केला नाही. त्यामुळे वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

असेच काम करायला सांगितलेय ?

खंडोजीबाबा चौकात खड्डे बुजविण्याचे काम काही कामगार करत होते. तेव्हा ‘लोकमत’ प्रतिनिधी त्या ठिकाणी गेला. कामगार घाईघाईत खड्ड्यात डांबर न टाकता केवळ खडी टाकत हाेते. त्याविषयी विचारले असता ते कामगार म्हणाले,‘‘आम्हाला वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून त्वरित खड्डे बुजवायला सांगितले आहेत.’’ यावर खड्ड्यात डांबर न टाकता खडी कशी काय टाकत आहात ? ती खडी पुन्हा वरती येईल ? असे त्यांना विचारले असता कामगार म्हणाले,‘‘हे काम असेच करायला सांगितले आहे.’’ यावरून स्पष्ट होते की, रस्त्याचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे आणि कसेही केले जात आहे.

कधी संपणार हे काम ?

टिळक रस्त्यावरून जाताना खूप धूळ उडते. त्याने नागरिकांच्या डोळ्यांना त्रास होत आहे. तसेच सर्व कपड्यांवर धूळ बसते. तसेच तेथील दुकानदार देखील खूप वैतागले आहेत. ते म्हणाले,‘‘कधी एकदाचे काम संपणार आहे काय माहिती? खूप परेशानी होतेय आम्हाला !’’

Web Title: Contractor's asphalt in Pune, roads are paved without asphalting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.