डोक्यात दगड घालून ठेकेदाराचा खून
By admin | Published: June 20, 2016 01:10 AM2016-06-20T01:10:27+5:302016-06-20T01:10:27+5:30
गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीने युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. मारुती गंगाराम (एमजी) कार्लेकर ऊर्फ रेड्डी (वय ३२, रा. कुरुळी, मूळ गाव नांदेड) असे
चाकण : कुरुळी (ता. खेड) गावच्या हद्दीत एका अज्ञात व्यक्तीने युवकाच्या डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. मारुती गंगाराम (एमजी) कार्लेकर ऊर्फ रेड्डी (वय ३२, रा. कुरुळी, मूळ गाव नांदेड) असे खून झालेल्याचे नाव आहे. हा खून कुरुळी मर्सिडीज कंपनीजवळ गायकवाडवस्तीकडे जाणाऱ्या रस्त्यावर झाला.
रेड्डी काल सकाळी घरातून बाहेर गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास मोबाईलवरून आपल्या पत्नीशी संपर्क केला होता. आज (दि. १९) सकाळी अज्ञाताचा मृतदेह आढळल्याचे नागरिकांनी पोलिसांना कळविले. रेड्डी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना हाऊसकीपिंगचे कामगार पुरविण्याचा व्यवसाय करीत होता. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी व पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतदेह विच्छेदन करण्यासाठी चाकण ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. रेड्डीची पत्नी लक्ष्मी मारुती कार्लेकर (वय २५, रा. निघोजे) हिने चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)