कोथरूड: पावसात रस्ता खचल्याने ठेकेदाराचे पितळ उघडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 03:53 PM2022-07-08T15:53:46+5:302022-07-08T15:54:19+5:30
रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडला आहे....
कोथरुड : येथील सुतारदरा रस्त्याच्या बाजूला साकेत सोसायटीसमोर पालिकेने केलेल्या रस्त्याच्या कामाचे पितळ उघडे पडले आहे. ड्रेनेज, केबल, लाइनसाठी नेहमीच रस्ते खोदले जातात. रस्त्याच्या मध्यभागी दुरुस्त केलेला रस्ता खचला आहे. त्यामुळे मधोमध मोठा खड्डा पडला आहे.
या खचलेल्या रस्त्यामुळे फूट-दीड फुटाची लांबलचक घळ निर्माण झाली आहे. अपरात्री एखाद्या वाहनचालकाचा या खचलेल्या रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे. या खचलेल्या रस्त्यात वाहने अडकण्याचे प्रकारही होत आहेत.
अगदी अल्पप्रमाणात पाऊस असूनदेखील रस्ता खचने म्हणजे रस्त्याचे काम पूर्ण केले की नाही, असा प्रश्न परिसरातील नागरिकांना पडला आहे. अल्प पावसाने या रस्त्याची दुरवस्था होऊन महापालिकेच्या कामाचे वाभाडे निघाले आहेत.
अवघ्या काही महिनाभरापूर्वी या रस्त्याचे काम झाल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर या रस्ता कामाची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी होत आहे. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केले आहे का, असा प्रश्न निर्माण होत आहे. जनतेकडून रस्त्याचा कर घेतला जातो. खराब रस्त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. दुरुस्तीच्या नावे जनतेच्या पैशाची लूट थांबेल का, असा प्रश्न येथील नागरिक करत आहेत.