ठेकेदारांसाठी शिक्षण मंडळ बनलेय ‘ग्राहक पेठ’

By Admin | Published: November 9, 2015 01:47 AM2015-11-09T01:47:01+5:302015-11-09T01:47:01+5:30

कोणतेही प्रॉडक्ट उपयुक्त असो अथवा नसो, ते गळी उतरविण्यासाठी ठेकेदारांनी महापालिका शिक्षण मंडळाची ग्राहक पेठ बनवली आहे.

Contractor's Council for Education | ठेकेदारांसाठी शिक्षण मंडळ बनलेय ‘ग्राहक पेठ’

ठेकेदारांसाठी शिक्षण मंडळ बनलेय ‘ग्राहक पेठ’

googlenewsNext

संजय माने, पिंपरी
कोणतेही प्रॉडक्ट उपयुक्त असो अथवा नसो, ते गळी उतरविण्यासाठी ठेकेदारांनी महापालिका शिक्षण मंडळाची ग्राहक पेठ बनवली आहे. कोणतेही प्रॉडक्ट, उपक्रम शिक्षण मंडळाच्या गळी उतरवून कोट्यवधी रुपये मिळवण्याची नाडी त्यांना गवसली आहे. मराठी लिहिता, वाचता येत नाही, अशा महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांसाठी थेट केंब्रिज विद्यापीठाचा इंग्रजी संभाषण वर्ग सुरू करण्याचा घाट घातला आहे.
शिक्षण मंडळाने एक कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी उपसूचना नुकतीच स्थायी समितीने मान्य केली. शालेय साहित्य तसेच गणवेश, बूट, मोजे खरेदीच्या निमित्ताने दर वर्षी महापालिकेच्या शिक्षण मंडळाचा अनागोंदी कारभार चर्चेत येतो. साहित्य खरेदी आणि ठेकेदार निश्चिती यात शिक्षण मंडळ पदाधिकारी आणि सदस्य यांना अधिक रस असल्याचा प्रत्यय वेळोवेळी येतो. शिक्षण मंडळ ही एक ग्राहकाभिमुख बाजारपेठ आहे, असा पदाधिकारी आणि सदस्यांचा समज झाला आहे. मर्जीतल्या ठेकेदाराला काम मिळवून दिले, एखाद्याने मांडलेल्या कल्पनेला मूर्त रूप दिले, तर टक्केवारीच्या माध्यमातून लाखो रुपये पदरात पडतात. हा फायद्याचा फॉर्म्युला पदाधिकारी आणि सदस्यांमध्ये रुजला आहे. नेमकी नाडी लक्षात घेऊन शिक्षण मंडळ हे हमखास गिऱ्हाईक बनू शकते, हे ठेकेदारांनी हेरले असून, ते विविध मार्गांनी शिक्षण मंडळाकडे लक्ष केंद्रित करू लागले आहेत.
एका खासगी संस्थेने पुणे महापालिकेतील इंग्रजी संभाषणाचा केंब्रिजचा फॉर्म्युला पिंपरीत लागू करण्याचा घाट घातला आहे. स्थायी समितीच्या दोन सदस्यांना पुढे करून त्यांच्या स्वाक्षरीने केंब्रिज विद्यापीठाच्या धर्तीवर पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी संभाषण शिकविण्याचा वर्ग सुरू करावा, अशी उपसूचना मांडण्यात आली. स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत ही उपसूचना कोणत्याही चर्चेशिवाय मंजूर करण्यात आली. अशा पद्धतीच्या
प्रस्तावांमुळे शिक्षण मंडळ नेहमी वादग्रस्त ठरले आहे.
यापूर्वी महापालिका शाळा इमारतींच्या ठिकाणी जलशुद्धीकरण उपकरणे बसविण्याची कल्पना मांडून एका ठेकेदाराने लाखो रुपये कमावले. पर्यावरण शिक्षण देण्याच्या नावाखाली पैसे कमावण्याचे उपक्रम ठेकेदारांनी यशस्वी केले आहेत. शिक्षण मंडळाच्या सदस्यांना अशा प्रकरणांमध्ये रस असल्याने पैसे कमावण्याचा उद्देश ठेवून येणाऱ्या ठेकेदारांचे फावले आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Contractor's Council for Education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.