महापौरांसमोरच ठेकेदारांचा वाद
By admin | Published: March 12, 2016 01:42 AM2016-03-12T01:42:36+5:302016-03-12T01:42:36+5:30
महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेका एकाच विशिष्ट ठेकेदाराला दिला जात असल्याची तक्रार महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे
पुणे : महापालिकेच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा ठेका एकाच विशिष्ट ठेकेदाराला दिला
जात असल्याची तक्रार महापौर प्रशांत जगताप यांच्याकडे दुसऱ्या ठेकेदाराने केली. दोन ठेकेदारांच्या या वादात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनांमध्ये नाहक जास्तीचा खर्च करून महापालिकेचे नुकसान होत असल्याचे उजेडात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन महापौर प्रशांत जगताप यांनी दिले आहे.
महापालिकेच्या वतीने दर वर्षी विविध सण, उत्सव, महापुरुषांच्या जयंतीनिमित्त शहराच्या विविध भागांमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमांच्या आयोजनाकरिता कोट्यवधी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आलेली असते. चालू वर्षाच्या अंदाजपत्रकामध्ये युवा महोत्सवासाठी एक कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकामध्ये करण्यात आली होती. त्याअंतर्गत छोटे कार्यक्रम घेऊन लाखो रुपये खर्च केल्याचे दाखविले जाते.
सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित महोत्सवासाठी काढलेल्या टेंडर प्रक्रियेमध्ये कमी रकमेचे टेंडर आले असतानाही जास्त रकमेचे टेंडर भरणाऱ्या ठेकेदाराला कार्यक्रमाचे काम देण्यात आल्याने हा प्रकार घडला आहे. यानिमित्ताने महोत्सवासाठी महापालिकेकडून जास्त रकमेची उधळपट्टी केली जात असल्याचे उजेडात आले आहे. याप्रकरणी जगताप यांनी हस्तक्षेप करून चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.