ठेकेदाराचा हलगर्जीपणा, नागरिकांच्या अंगणात पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2021 04:10 AM2021-04-15T04:10:34+5:302021-04-15T04:10:34+5:30
नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत विकासकामातील भ्रष्ट कारभार थांबण्याचे नाव घेत नसून विकासकामातील अनियमितता व चुका दिवसेंदिवस ...
नीरा : गुळुंचे (ता. पुरंदर) येथील ग्रामपंचायत विकासकामातील भ्रष्ट कारभार थांबण्याचे नाव घेत नसून विकासकामातील अनियमितता व चुका दिवसेंदिवस बाहेर येत आहेत. गुळुंचे मंदिर ते पुढील बाजूला नुकत्याच केलेल्या अंतर्गत रस्त्याच्या कामात ठेकेदारांने हलगर्जीपणा करत काम पूर्ण केले. त्याचा फटका म्हणजे नागरिकांच्या अंगणात वाहून आलेले अस्वच्छ पाणी साठले आहे. त्यामुळे ही विकासकामे आहेत की मागासलेपणाची कामे आहेत, असा प्रश्न आता नागरिकांत निर्माण होऊ लागला असून संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जिल्हा परिषदेचा पुरंदर पंचायत समितीच्या बांधकाम विभागाने गुळुंचे येथील अनेक कामांकडे दुर्लक्ष करत डोळेझाक केली. त्याचा परिणाम म्हणजे ग्रामपंचायतीने परवानगी दिलेली भक्त निवास, महिला अस्मिता भवन, ज्येष्ठ नागरिक सभागृह या इमारती ग्रामपंचायत मालकीच्या जागेत उभ्या न राहता त्या चक्क तिसऱ्याच जागेत बांधण्यात आल्या. यापूर्वी वादातीत ठरलेला पेठ रस्ता अतिक्रमण न काढता निकृष्ट दर्जाचा व कमी अधिक लांबी रुंदी असणारा तयार केला. ग्रामपंचायतीकडे रस्त्याचे नमुना नंबर २६ चे रजिस्टर नसतानाही अंदाजे कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यामुळे जे रस्ते म्हणून अस्तित्वात नाहीत तेथे अंतर्गत रस्ते उभे राहू लागले. आता नुकत्याच केलेल्या अंतर्गत रस्त्याच्या वाढीव उंचीने किरकोळ पावसातदेखील पाणी नागरिकांच्या अंगणात साठले आहे. जोरदार पाऊस झाल्यास हे पाणी घरात घुसण्याची शक्यता आहे.
विकासकामात मोठ्या प्रमाणावर अनियमितता असताना देखील बांधकाम विभागाने आजपर्यंत याची साधी चौकशी देखील केलेली नाही. बांधकाम परवाना देणारे, नियोजित आराखडा मंजूर करणारे, बिले काढणारे सर्वच अभियंता यात दोषी असून ठेकेदारांना बिले अदा केली जात आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद यांनी याकडे लक्ष घालून बेकायदा मनमानी कामे करणाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे तसेच भ्रष्ट काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची मागणी आता नागरिक करत आहेत.
ठेकेदाराने नियम धाब्यावर बसवत रस्ता तयार केला आहे. बांधकाम विभागाने मंजुरी दिलेल्या व कामे पूर्ण झालेल्या अनेक कामात अनियमितता व भ्रष्टाचार झाला आहे. तक्रारी असतानाही कामांची बिलेदेखील अदा केली जात असल्याने सर्वांवर कारवाई करावी अन्यथा आंदोलन उभारले जाईल याची नोंद घ्यावी. - अक्षय निगडे, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
१४ नीरा
गुळुंचे येथील रहिवाशांच्या अंगणात साचलेले पाणी.