पुणे शहरातील 'आंबील ओढा कलव्हर्ट' च्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेत ठेकेदारांची 'रिंग'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2020 08:45 PM2020-05-08T20:45:59+5:302020-05-08T20:58:36+5:30
पुणे महापालिका कारणे दाखवा नोटीस बजावणार
अपात्र असतानाही दिली मंजुरी
पुणे : शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरात आंबील ओढ्यावरील पुलांचे नुकसान झाले होते. या २१ ठिकाणच्या कलव्हर्टच्या बांधकामाकरिता काढण्यात आलेल्या ३८ कोटी रुपयांच्या निविदेमध्ये ठेकेदारांची 'रिंग' झाली असून अपात्र ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आल्याचा प्रताप उघडकीस आला आहे. याप्रकरणी सल्लागाराला पालिका कारणे दाखवा नोटीस बजावणार आहे.
शहरात २५ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे पूर आला होता. यामध्ये सर्वाधिक नुकसान आंबील ओढ्याचे झोके होते. १४ किलोमीटरच्या या नाल्यावर नुकसान झालेल्या कलव्हर्टसचे काम करण्याकरिता पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. एकूण ३८ कोटींच्या पाच निविदा काढण्यात आल्या होत्या. या कामाकरिता पालिकेने सल्लागार म्हणून एका कंपनीची नेमणूक केली होती. ठेकेदारांनी सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून त्याची माहिती प्रशासनाला देणे सल्लागाराचे काम होते. परंतु, अपात्र असलेल्या ठेकेदारांना पात्र ठरविण्यात आल्याचा आणि यामध्ये ठेकेदारांनी 'रिंग' केल्याचा आरोप काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे आणि मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी केला होता. याबाबत आयुक्तांना पत्रही देण्यात आली होती.
दरम्यान, यातील दोन निविदा रद्द ठेकेदार अपात्र ठरविण्यात आल्याने रद्द करण्यात आल्या. तर, अन्य तीन निविदा स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी ठेवण्यात आल्या होत्या. स्थायीने त्याला मान्यता दिली होती. अद्याप त्यांना वर्क आॅर्डर देण्यात आलेली नव्हती. पात्र नसताना निविदा उघडल्याने झालेल्या गदारोळामुळे संशयाची सुई सल्लागारकडे गेल्याचा विरोधी पक्षांचा आरोप आहे. संशयाच्या भोव?्यात अडकलेल्या या निविदांप्रकरणी सल्लागाराला खुलासा करण्यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस बजावण्यात येणार आहे.