‘ठेकेदारी’ने बारामती पालिकेची लूट
By admin | Published: December 3, 2014 02:58 AM2014-12-03T02:58:05+5:302014-12-03T02:58:05+5:30
नगरपालिकेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. यातून स्वच्छतेसाठी ४४ ते ४५ लाख रुपये खर्च येत आहेत
बारामती : नगरपालिकेत आरोग्य विभागाच्या अंतर्गत ठेकेदारी पद्धतीने कामे करून घेतली जात आहेत. यातून स्वच्छतेसाठी ४४ ते ४५ लाख रुपये खर्च येत आहेत. ठेकेदारीच्या नावाने नगरपालिकेत लूट सुरू आहे. असे असताना शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.
तृतीय, चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरतीचा ठराव चार महिन्यांपूर्वी झाला आहे. मात्र, ठेकेदारीतून कुरण चरायला मिळत आहे, त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. सार्वजनिक स्वच्छतेसाठी नगरपालिकेतील कायम कामगार आहेत, ठेकेदारी पद्धतीने स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाने काम दिले आहे. तसेच शहरातील नगरपालिकेच्या व्यापार संकुुलाच्या सफाईसाठी ठेकेदारी पद्धतीने कामे दिली आहेत. तरीदेखील बारामती शहरात सार्वजनिक स्वच्छतेकडे लक्ष देण्यात आलेले नाही.
आॅगस्ट २०१४ पासून बारामतीत विषाणूजन्य आजाराने थैमान घातले आहे. ऐन दिवाळीच्या सणाच्या काळात बारामतीच्या रुग्णालयात डेंगी, गोचीडतापासह अन्य आजारांनी त्रस्त रुग्णांची संख्या वाढलेली असताना, आरोग्य विभागाने लक्ष दिले नाही, अशी तक्रार ज्येष्ठ नगरसेवक सुभाष ढोले यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. विषाणूजन्य रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यंत ३ लोकांचा बळी बारामतीत डेंगीमुळे गेला. आरोग्य विभागाने मागणी केल्याप्रमाणे सर्व यंत्रणा देण्यात आल्या आहेत.
ठरावीक नगरसेवकांच्या दिमतीला बारामती नगरपालिकेचे आरोग्य विभागाचे अधिकारी आहेत. त्यामुुळेच आरोग्य निरीक्षकांची बदली होऊनदेखील त्यांना बारामती नगरपालिकेतून सोडण्यात आलेले नाही. काहीही कारणे दाखवून बदली थांबविली जाते. आरोग्य विभागाच्या कार्यालयातच ठेकेदारांचा सतत
वावर असतो.
ठेकेदारांच्या कामासाठी ठेवलेला कर्मचारी आरोग्य विभागाचा कारभार संभाळत असल्याचे छायाचित्रच नगरसेवक सुभाष ढोले यांनी सर्वसाधारण सभेत सादर केले. अधिकारी आणि ठेकेदारांची मिलीभगत असल्याशिवाय हे होत नाही, असा थेट आरोपदेखील त्यांनी केला. ठेकेदारीला प्रोत्साहन देणारी मंडळी मालामाल झाली आहे. नागरिकांचे प्रश्न कायम आहेत. (प्रतिनिधी)