चित्रसृष्टीत तंत्रज्ञांचे योगदान उपेक्षितच

By admin | Published: July 7, 2017 02:38 AM2017-07-07T02:38:10+5:302017-07-07T02:38:10+5:30

विदेशातील तंत्रज्ञांच्या कामाची नेहमीच दखल घेतली जाते; परंतु भारतातले तंत्रज्ञदेखील त्यांच्या तुलनेत कुठेच कमी नसतानाही कोणत्याच पुरस्कार यादीत

The contribution of the filmmakers to the film industry is neglected | चित्रसृष्टीत तंत्रज्ञांचे योगदान उपेक्षितच

चित्रसृष्टीत तंत्रज्ञांचे योगदान उपेक्षितच

Next

विदेशातील तंत्रज्ञांच्या कामाची नेहमीच दखल घेतली जाते; परंतु भारतातले तंत्रज्ञदेखील त्यांच्या तुलनेत कुठेच कमी नसतानाही कोणत्याच पुरस्कार यादीत त्यांचा समावेश केला जात नाही. त्यामुळे एका भारतीयाला आॅस्कर अ‍ॅकॅडमीमध्ये इतके मोठे स्थान मिळणे म्हणजे एकप्रकारे सर्वोच्च सन्मान आहे, अशी भावना व्यक्त करीत सोसायटी आॅफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन (एसएनपीटी) या जागतिक संस्थेच्या भारतीय विभागाचे अध्यक्ष आणि एनएफएआयचे तंत्रज्ञ सल्लागार उज्ज्वल निरगुडकर यांनी डिजिटल चित्रपटगृहांची जगमान्य मूल्यांकन पद्धत भारतात विकसित करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ’लोकमतशी’ बोलताना सांगितले.

ते म्हणाले, गेली ३६ वर्षे केमिकल इंजिनिअर म्हणून तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. इथे येण्यापूर्वी चित्रसंस्कृतीची मुहूर्तमेढ भारतात रुजली, तरी आपण अजूनही परदेशातले तंत्रज्ञान का वापरतो, असा प्रश्न मला कायम पडायचा. भारतातले तंत्रज्ञ विदेशाच्या तुलनेत कुठेच कमी नसतानाही, त्यांना केवळ व्यासपीठ मिळत नसल्याने त्यांची दखल घेतली जात नाही, हे सातत्याने जाणवले. १९९३ मध्ये सोसायटी आॅफ मोशन पिक्चर अँड टेलिव्हिजन (एसएनपीटी) या जागतिक संस्थेच्या परिषदेत एक शोधनिबंध सादर केला आणि तोच जीवनाचा टर्निंग पॉइंट ठरला. चित्रपट निर्मिती प्रक्रियेसाठी एक विशिष्ट रसायन वापरले जायचे, मात्र त्यासाठी एक पर्याय शोधून काढला. हे तंत्रज्ञान जगभरात नेऊ शकतो, असे वाटल्याने ग्रीन परिषदेत त्याचे सादरीकरण केले. त्याचे खूप कौतुक झाले. एसएनपीटीची फेलोशिप मिळाली. जगभरात हे तंत्रज्ञान पोहोचविले. एसएनपीटीने चित्रपटांच्या उत्कृष्ट दर्जासाठी जवळपास ४८ मूल्यांकन निश्चित केली आहेत. अगदी चित्र कसे असले पाहिजे, आवाज कसा असावा, यावर भर दिला आहे. जगभरातील विविध चित्रपटगृहांमध्ये चित्राचा रंग वेगवेगळा दिसू शकतो; मात्र तो एकच कसा असला पाहिजे, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. चित्राचे रंग एकसारख्या प्रमाणात जुळवून घेतले, तर चित्र चांगल्या प्रकारे दिसू शकते. २००८ नंतर संपूर्ण जगभरात डिजिटल तंत्रज्ञानाचे वारे वाहू लागले, असले तरी भारतातील चित्रपटगृहांमध्येही आदर्श मूल्यांकन पद्धत अद्यापही लागू झालेली नाही. आजही चित्रपट जसा दिसतो तसाच दाखविण्याची मानसिकता पाहायला मिळते. ही मूल्यांकन पद्धत भारतातील चित्रपटगृहांसाठीही लागू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या अनेक वर्षांत चित्रपटांच्या तंत्रज्ञानामध्ये झपाट्याने बदल झाले आहेत. हॉलिवूडमध्ये चित्रपट प्रोजेक्शनसाठी 4 के तंत्रज्ञानाचा वापर केला जातोय; पण आपण अजूनही मागे आहोत. भारतातील ९० टक्के चित्रपटगृह आता डिजिटल झाली आहेत. पूर्वी यूएफओकडून सॅटेलाइटद्वारे चित्रपट पाठविला जायचा, मॅन्युअली तो देण्याची गरज नव्हती, आॅनलाइन प्रोजेक्शनसाठी पासवर्ड आल्यानंतरच तो चित्रपट डाऊनलोड करता येणे शक्य होते. आता डीसीपी प्रोजेक्टर आणि 2 के फॉरमॅटमध्ये चित्रपटगृहात चित्रपट दाखविले जात आहेत. उदा.: 2 के पद्धतीमध्ये वितरकांकडून चित्रपटगृहांना हार्डडिस्क दिली जाते, त्यानंतर ज्या वेळी चित्रपटाचा शो दाखवायचा असतो, तेव्हा मेलद्वारे एक विशिष्ट कोड पाठविला जातो, मगच चित्रपट दाखविला जातो. भारतात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) हे हॉलिवूडमध्ये वापरल्या जाणाऱ्या 4 के फॉरमॅटमध्ये चित्रपट दाखविण्यासाठी सज्ज झाले आहे.
आगामी शतक हे तंत्रज्ञानाचे असल्याने नवनवीन तंत्रज्ञानाची भर पडत जाणार आहे. समुद्रामध्ये फायबर केबल टाकून इंटरनेटचा स्पीड वाढविण्याच्या दृष्टीने पावले उचलली जात आहेत, चित्रपट प्रोजेक्शनसाठी याचा नक्कीच फायदा होईल. त्यामुळे हार्डडिस्कची गरज यापुढे भासणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
आॅस्कर अ‍ॅकॅडमीचे सदस्य म्हणून प्रथमच एका भारतीय तंत्रज्ञाची निवड झाली आहे, हा केवळ माझा नव्हे सर्व तंत्रज्ञांचा सन्मान आहे. त्याचा उपयोग भारतासाठी कसा करून घेता येईल, त्यावर अधिक भर देणार आहे; तसेच भारतासह मराठी चित्रपट क्षेत्रात आॅस्करच्या प्रक्रियेविषयी अनभिज्ञता दिसून येते. प्रक्रिया काय असते, याची माहिती नसते. यादृष्टीने मदत करून भारतीय चित्रपट चळवळ पुढे नेण्याचा प्रयत्न करणार आहे.

Web Title: The contribution of the filmmakers to the film industry is neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.