जुन्नरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीस भौगोलिक घटकांचे योगदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:13 AM2021-08-29T04:13:40+5:302021-08-29T04:13:40+5:30
जुन्नरच्या पर्यावरणाला अनुकूल भौगोलिक घटकांची जोड जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - ५ 】 खोडद : पर्यावरण ही ...
जुन्नरच्या पर्यावरणाला अनुकूल भौगोलिक घटकांची जोड
जुन्नरचे समृद्ध पर्यावरण - 【भाग - ५ 】
खोडद : पर्यावरण ही बहुचर्चित संकल्पना बनली असून ती अध्ययनाचा संशोधनाचा, जनजागृतीचा व चळवळीचा विषय ठरत आहे. जुन्नरच्या पर्यावरणाला अनुकूल भौगोलिक घटकांची जोड मिळाली आहे. या घटकावर पर्यावरणाचा विकास व संतुलन अवलंबून आहे. त्याचबरोबर सांस्कृतिक पर्यावरण घडत असते. जुन्नरच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीस भौगोलिक घटकांचे योगदान मोठे आहे.
जुन्नरच्या परिसरात निसर्गाने नटलेले किल्ले चावंड (चावंड गाव), जीवधन (घाटघर) , नारायणगड ( खोडद), निमगिरीव हनुमंतगड (निमगिरी गाव), शिवनेरी (जुन्नर), सिंदोळा (मढ, पारगाव), हडसर (हडसर गाव), ढाकोबा (आंबोली), हरिश्चंद्रगड (खिरेश्वर) तर डोंगरकड्यात माळशेज घाट, नाणे घाट व दाऱ्या घाट आहे. तसेच या पर्वत रांगांमध्ये अनेक बुद्धलेण्यादेखील आहेत.
जुन्नर तालुक्यात पावसाळ्यात पर्जन्याबरोबरच धुक्याचा आनंद पर्यटकांना घेता येतो. येथील हवामानात व जमिनीत विविध प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पतींची वाढ होते. जुन्नरच्या या पठाराला वनरक्षक डॉ. अलेक्झांडर गिब्सन यांनी भारताचे आरोग्य केंद्र म्हटले आहे. ब्रिटिश काळात डॉ. गिब्सन हे ब्रिटिशांना जुन्नरला जाऊन आराम करायचा सल्ला देत असत. येथील स्वच्छ आणि मोकळ्या हवेत श्वसनाचे आजार बरे होतात हे त्यांचे निरीक्षण होते. येथील हवामान विशेषतः पश्चिम भागात आल्हाददायक बनले आहे. पश्चिम भागात जास्त प्रमाणात पडणारा पाऊस पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आहे.
फोपसंडी येथे मांडवी नदीचा उगम, हरिश्चंद्रगड येथे पुष्पावती नदीचा उगम, कुकडेश्वर येथे कुकडी नदीचा उगम, आंबोली मीना नदीचा उगम ही सर्व ठिकाणे, जुन्नरच्या आणे घाटातील नैसर्गिक पूल, बोरी गावात कुकडी नदीपात्रात ज्वालामुखीची राख आढळते. वडगाव सहानी येथे मीना नदीपात्रात लहान रांजणखळगे आढळतात.
जुन्नरमध्ये नदीच्या उगमस्थान प्रदेशात आंबोली, नाणेघाट, माळशेज घाट, इंगळून हातवीज, दुर्गादेवी, मुंजाबा डोंगर (धुरळनी) येथे धबधबे तयार झाले आहेत. ही सर्व जुन्नरचे भौगोलिक महत्त्वाची ठिकाणे प्रसिद्ध आहेत.
================================
‘‘भौगोलिकदृष्ट्या जुन्नर तालुका दख्खनच्या पठाराचा व सह्याद्रीच्या डोंगर रांगा असलेला भूभाग समुद्रसपाटीपासून पश्चिमेकडून पूर्वेकडे कमी होत जातो. पश्चिमेकडून जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे. जुन्नर हा बेसॉल्ट या टिकाऊ खडकाचा प्रदेश असल्याने भारतातील सर्वात जास्त गिरिदुर्ग जुन्नरमध्ये निर्माण झाले. जुन्नरच्या इतिहासकालीन वैभवाचे इथल्या संपन्न पर्यावरणाचे आणि आरोग्यसंपन्न हवामानाचे मोठे योगदान आहे.’’
- डॉ. शरद काफले,
पर्यावरणशास्त्र विभाग
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय,
नारायणगाव
280821\20210828_182502.jpg
?????? : ?????????? ?????? ??????? ???? ?????? ????? ???????.