जी सॅट-७ च्या यशस्वी उड्डाणात वालचंदनगरचा वाटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 11:59 PM2018-12-20T23:59:21+5:302018-12-20T23:59:55+5:30
महत्त्वाची उपकरणे बनविली
रेडणी : भारतीय अवकाश संस्थेच्या (इस्रो) जी सॅट-७ ए या उपग्रहाने बुधवारी (दि. १९) यशस्वी उड्डाण केले. हा लष्कराचा ३९वा दळणवळण उपग्रह आहे. या उपग्रहामुळे हवाई दलाची ताकद आणखी वाढणार आहे. या उपग्रहामध्ये वालचंदनगर (ता. इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग असून, वालचंदनगर कंपनीने आपल्या नावलौकिकास साजेशी कामगिरी बजावली असल्याची माहिती वालचंदनगर कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी जी. के. पिल्लई यांनी दिली.
या उपग्रहामध्ये ४ सोलर पॅनल बसविण्यात आले आहेत. त्यातून जवळपास ३.३ किलोवॉट विजेची निर्मिती केली जाणार आहे. या मोहिमेमध्ये वालचंदनगर कंपनीने रॉकेटच्या मोटर, केसिंग, हेड अँड सेगमेंट, नोझल अँड सेगमेंट ही महत्त्वाची उपकरणे तयार केली असून त्याचा उपयोग मोहिमेच्या पहिल्या स्टेजमध्ये केला जातो. वालचंदनगर कंपनी गेल्या चार दशकांपासून अवकाश यानासंदर्भात महत्त्वाची उपकरणे तयार करीत असून चांद्रयान, मंगळयान या मोहिमांमध्ये वालचंदनगर कंपनीचा मोलाचा सहभाग आहे.
कंपनी बदलत्या काळानुसार आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून पूर्ण कार्यक्षमतेने देशाच्या मिसाईल, डिफेन्स व एरोस्पेस या विभागांसाठी कार्य करीत असल्याची माहिती जी. के. पिल्लई यांनी दिली.