खाटा अडवल्याच्या प्रकारांवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:11 AM2021-04-20T04:11:45+5:302021-04-20T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या रूग्णालयांसह शहरातील अन्य खाजगी रूग्णालयांमध्ये ज्या कोरोनाबाधित रूग्णांना, खरोखरच रूग्णालयात उपचाराची गरज आहे, ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : महापालिकेच्या रूग्णालयांसह शहरातील अन्य खाजगी रूग्णालयांमध्ये ज्या कोरोनाबाधित रूग्णांना, खरोखरच रूग्णालयात उपचाराची गरज आहे, त्यांनाच दाखल करून घेण्याबाबत आदेश देण्यात आले आहेत़ तसेच याबाबत महापालिकेच्या यंत्रणेकडूनही शहानिशा करण्यात आली असून, रूग्णालयातील खाटा अडवून ठेवण्याच्या प्रकाराला पूर्णत: आळा घालण्यात आला आहे़ आजमितीला शहरात कुठल्याही रूग्णालयात खाटा अडवून ठेवण्याच्या घटना कुठेही नसल्याची माहिती पुणे महापालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली आहे़
पुणे शहरातील महापालिकेच्या रूग्णालयांसह खाजगी रूग्णालयांमध्ये सुमारे ९ हजार कोरोनाबाधित उपचार घेत असून, यापैकी बहुतांशी रूग्णांवर आॅक्सिजनसह उपचार चालू आहेत़ तर काही आयसीयूमध्ये व व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत़ याचबरोबर जे अन्य कोरोनाबाधित रूग्ण रूग्णालयात उपचार घेत आहेत, त्या रूग्णांना अन्य आजार उदा़ मधुमेह, उच्च रक्तदाब व इतर अन्य आजार आहेत़ त्यामुळे विनाकारण रूग्णालयातील खाटा अडवून ठेवण्याचे प्रकार शहरात कुठल्याच रूग्णालयांमध्ये नाहीत़ याची खातरजमा महापालिकेने स्वत: तपासणी करून केली असल्याचेही कुमार यांनी सांगितले़
---------------
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच रूग्णालयात दाखल व्हावे : महापालिका आयुक्त
शहरातील सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या आजमितीला ५४ हजार ६०० पर्यंत गेली असून, यापैकी बहुतांशी रूग्ण हे होम आयसोलेशनमध्ये आहेत़ काही जण रूग्णालयात आपल्या कोरोनाबाधितांवर उपचार व्हावेत असा आग्रह धरतात़ परंतु, रूग्णालयात उपचाराची खरोखरच आवश्यकता आहे का, याचा निर्णय डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेण्यात यावा, असे आवाहनही महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी केले आहे़
---------------------