वादग्रस्त 'समर्थ श्री रामदास स्वामी पुस्तक' शासनाकडून अखेर मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2018 07:37 PM2018-10-13T19:37:47+5:302018-10-13T19:44:59+5:30
संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त मजकूर असलेले समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेकडून मागे घेण्यात अाले अाहे.
पुणे : शालेय शिक्षण विभागांतर्गत सर्व शिक्षा अभियानाच्या डॉ. शुभा साठे लिखित 'समर्थ श्री रामदास स्वामी' पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज हे दारूच्या नशेत असायचे, असा उल्लेख केल्यानं वाद निर्माण झाला हाेता. त्यानंतर अाता शासनाने हे पुस्तक मागे घेतले असून हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनास उपलब्ध करुन देण्यात येऊ नये असा अादेश काढण्यात अाला अाहे.
सर्व शिक्षा अभियानाच्या 'समर्थ श्री रामदास स्वामी' या पुस्तकात 'संभाजी राजा दारुच्या कैफात व कलुशाच्या जाळ्यात सापडला हाेता', असा वादग्रस्त उल्लेख करण्यात अाला हाेता. त्यानंतर संभाजी ब्रिगेडने अाक्रमक पवित्रा घेत पुस्तक रद्द करण्याची तसेच संभाजी महाराजांची बदनामी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली हाेती. अाता राज्य शैक्षणिक संशाेधन व प्रशिक्षण परिषदेकडून पत्र काढण्यात अाले असून त्यात समर्थ श्री रामदास स्वामी हे पुस्तक विद्यार्थ्यांना वाचनासाठी देऊ नये असे सांगण्यात अाले अाहे. परिषदेचे उपसंचालक (समन्वय) यांच्या सहिने हे पत्र काढण्यात अाले अाहे.
संभाजी महाराज दारूच्या नशेत असायचे, राज्य सरकारच्या पुस्तकातील प्रताप
'एकभाषिक पूरक वाचन पुस्तक याेजनेअंतर्गत पुरविण्यात अालेल्या पुस्तकांमधील लाख प्रकाशन, नागपूर या प्रकाशनाच्या समर्थ श्री रामदास स्वामी या पुस्तकाच्या बाबतीत सदर पुस्तकामध्ये संभाजी महाराजांविषयी अवमानकारक उल्लेख असल्याचा अाक्षेप घेण्यात अाला अाहे. सदर अाक्षेपासाठी इतिहास तज्ञांची समिती नेमून शासन स्तरावरुन पुढील अादेश हाेईपर्यंत सदर पुस्तकाच्या शाळांमधील सर्व प्रती संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकाच्या ताब्यात ठेवण्यात याव्यात'. असा अादेश पत्राच्या माध्यमातून देण्यात अाला अाहे.
दरम्यान हे प्रकरण ताजे असतानाच सर्व शिक्षा अभियानाच्या अाणखी एका पुस्तकात वादग्रस्त मजकुर लिहील्याचे समाेर अाले अाहे. ‘संतांचे जीवन प्रसंग’ या गोपीनाथ तळवलकर लिखितपुस्तकात तुकाराम महाराजांची बायको फार रागीट. तोंडाला कुत्रे बांधावे ना तसे, तिच्या तोंडून कायम नेहेमी शिव्याच बाहेर यायच्या. ‘ते आमचं येडं’ असं आपल्या पतीला ती म्हणायची. पण मनाने फार प्रेमळ आणि पतिभक्त. काशी आणि महादू ही त्यांची मुले. असा उल्लेख करण्यात अाला अाहे.