वादग्रस्त मंडलाधिकारी जयश्री कवडेचे निलंबन, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 02:59 PM2024-03-21T14:59:55+5:302024-03-21T15:00:20+5:30
जयश्री कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे...
थेऊर (पुणे) : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार असलेल्या थेऊरच्या मंडलाधिकारी जयश्री कवडे यांना शासकीय सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी कवडे यांच्या निलंबनाचा आदेश पारित केला आहे. जयश्री कवडे यांना तीन वर्षांत दोन वेळा निलंबित केल्याने त्यांची एकूणच कारकीर्द वादग्रस्त ठरली आहे.
भोसरी येथे एकाच गावात, एकाच गट नबंरमधील फेरफारबाबत जयश्री कवडेंनी तीन वेळा आदेश पारित केले होते. त्यामुळे १७ ऑक्टोबर २०२२ला तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी त्यांना निलंबित केले होते. त्यानंतर थेऊर मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असताना १३ मार्चला त्यांच्यासह त्यांच्या दोन बगलबच्चांवर सात हजार रुपयांची लाच स्वीकारल्याचा गुन्हा एसीबीने दाखल केला आहे. मात्र, कवडे त्या दिवसापासून फरार असल्याने जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी त्यांचे १९ मार्चला निलंबन केले आहे.
जयश्री कवडे, मंडल अधिकारी थेऊर यांच्या विरुध्द लोणीकाळभोर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्याने कवडे या गुन्हा दाखल झाल्यापासून म्हणजेच दिनांक १३ मार्चपासून मिळून आलेल्या नसल्याने आणि तसेच त्यांनी इकडील कार्यालयास कोणताही संपर्क केला नसल्याने त्यांना शासन सेवेतून गुन्हा दाखल झाल्याच्या मानिव दिनांकापासून म्हणजे दिनांक १३ पासून शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. पुढील आदेश काढले जाईपर्यंत त्या निलंबित राहतील, असे स्पष्टपणे जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी पारित केलेल्या आदेशात नमूद केले आहे.