महिलांविरोधात वादग्रस्त वक्तव्य भोवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2021 04:11 AM2021-09-23T04:11:45+5:302021-09-23T04:11:45+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवेशावर महिलांविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध कलम ५०९ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर येथे १३ सप्टेंबर रोजी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमातील भाषणामध्ये प्रवीण दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत वादग्रस्त व्यक्तव्य केले होते. या वक्तव्याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडिया व वृत्तवाहिन्या व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित झालेले आहे. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर या १४ सप्टेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमध्ये येत होत्या. त्या पार्श्वभूमीवर दरेकर यांनी हे विधान केले होते. त्यांनी केलेल्या विधानामुळे एक स्त्री म्हणून माझ्या मनास लज्जा उत्पन्न झाली आहे. दरेकर यांनी केलेल्या वक्तव्यामुळे तमाम महिला वर्गाच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न होऊन महिलांच्या विनयशीलतेचा अपमान केलेला आहे, असे फिर्यादीत म्हटले आहे. रूपाली चाकणकर यांनी सिंहगड रोड पोलिसांकडे अर्ज दिला होता. मंगळवारी मध्यरात्री उशिरा पोलिसांनी प्रवीण दरेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फोटो - प्रवीण दरेकर