Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 01:45 PM2024-06-01T13:45:16+5:302024-06-01T13:46:37+5:30

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे...

Controversy again, academics demand exclusion of controversial sections from list of 64 fine arts | Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

Maharashtra: ६४ ललित कलांच्या यादीवरून पुन्हा वादंग; वादग्रस्त भाग वगळण्याची अभ्यासकांची मागणी

पुणे : राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षण मसुद्यात मनुस्मृती ग्रंथातील संदर्भाचा उल्लेख केल्यावरून वाद सुरू असताना आणखी नवीन वाद निर्माण झाला आहे. कलाशिक्षण प्रकरणात ६४ ललित कलांची यादी दिली असून, त्याचा स्रोत वात्स्यायन यांचे कामशास्त्र असल्याचे नमूद आहे. मनुस्मृतीप्रमाणेच हा उल्लेख शालेय आराखड्यात करणे अत्यंत चुकीचे आहे. यातील जुगार खेळणे, चलाखी करून हाताेहात फसवणे, गारूडविद्या आणि जादूटोणा यांचे ज्ञान असणे आदी कलांचाही उल्लेख असून, त्या भारतीय संविधान आणि कायद्याविरुद्ध असल्याचे सांगत हे संदर्भ वगळावेत, अशी मागणी साहित्यिक, अभ्यासकांनी केली आहे.

एससीईआरटीने राज्य अभ्यासक्रम आराखडा- शालेय शिक्षणाचा मसुदा प्रसिद्ध केला आहे. त्यावर महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, आंतरभारती, राष्ट्र सेवा दल, शिक्षण हक्क परिषद आणि साहित्यिक कलावंतांनी व्यापक चर्चा केली आणि काही आक्षेप, तसेच प्रतिक्रिया, सूचना राज्य सरकारला सुचविल्या आहेत. मसाप येथे आयाेजित पत्रकार परिषदेत भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष व माजी संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, ज्येष्ठ वात्रटिकाकार रामदास फुटाणे, मसापच्या कार्यवाह सुनीताराजे पवार, अंजली कुलकर्णी, संदीप सांगळे आदी मान्यवर उपस्थित हाेते.

अभ्यासक्रम आराखड्यातील कलाशिक्षण प्रकरण ५ मधील पृष्ठ क्रमांक २१६ त्यातील परिशिष्ट- अ मध्ये ६४ ललितकलांची यादी दिली आहे. ती मुनी वात्स्यायन यांच्या कामशास्त्रावरून घेतली आहे. त्यातील छलिक याेग (चलाखी करून हाताेहात फसवणे), द्यूतक्रीडा (जुगार खेळणे), इंद्रजाल (गारूडविद्या व जादूटाेणा यांचे ज्ञान असणे) या कामशास्त्रातील ललितकला नैतिकतेविरुद्ध आहेत. हा संदर्भ मनुस्मृतीप्रमाणे वादाचा आहे. या यादीतील अनेक कला भारतीय राज्यघटनेनुसार अपेक्षित समाजनिर्मित्ती आणि नैतिक मूल्यांविरुद्ध आहेत. अंधविश्वाला चालना देणाऱ्या आहेत. थाेडक्यात ही ललितकलांची यादी आजच्या आधुनिक काळात कालबाह्य झाली आहे, म्हणून ती वगळावी त्याऐवजी आधुनिक काळाशी सुसंगत अशी ललित कलांची यादी बनवावी. उदा. ओराेगामी ही कागदाची हस्तकला, सुलेखन, मेकअप, कॉम्प्युटर, पेंटिंग, अशा स्वरूपाच्या विविध कलांची यादी तज्ज्ञ व्यक्तीकडून बनवून समाविष्ट करावी, असे नमूद केले आहे.

अभिप्राय आणि नवीन सूचना :

१. सर्व भाषा माध्यमे व शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत मराठी व इंग्रजी अनिवार्य करा.

२. भारत हा बहुधार्मिक, बहुसांस्कृतिक आणि संविधानाप्रमाणे धर्मनिरपेक्ष देश आहे, त्यामुळे शालेय शिक्षणात सरकारी धोरण म्हणून धार्मिक शिक्षण असू नये.

३.सर्वधर्मसमभाव या संविधानाच्या तत्त्वाचे उपक्रम राबविताना पालन करावे.

४. मनुस्मृती हा ग्रंथ जातीव्यवस्था समर्थक आणि स्त्री वर्गास दुय्यम लेखणारा आहे, तो भारतीय संविधानविराेधी आहे. अंतिम आराखड्यातून उल्लेख वगळावा.

५. विज्ञान शिक्षणातून विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे व प्रश्न विचारण्याची संस्कृती निर्माण करून त्यातूनच संशोधन वृत्ती वाढीस लागू शकते.

६. समाजशास्त्र शिक्षणाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांत संवेदनशीलता, सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे, हे असावे.

७. अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण हे सातवी ते बारावी विद्यार्थ्यांसाठी आणि पाचवी ते बारावीतील विद्यार्थ्यांसाठी संविधान शिक्षणाचा समावेश करावा.

पाठ्यपुस्तके निर्मितीमध्ये सर्वसमावेशकता गरजेची

प्रबोधन चळवळ व स्वातंत्र्य संग्रामातून सर्वमान्य झालेली पुरोगामी व आधुनिक मूल्ये आणि संविधानिक तत्त्वज्ञानाचे विद्यार्थ्यांवर संस्कार करणे आहे, तसेच संकीर्ण सांप्रदायिकता व भेदभावास त्यात थारा नसेल, याची पाठ्यपुस्तके लिहिताना दक्षता घेणे आवश्यक आहे.

Web Title: Controversy again, academics demand exclusion of controversial sections from list of 64 fine arts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.