ससाणेनगर भुयारी मार्गावरून नेत्यांमध्ये वाद
By admin | Published: April 9, 2015 05:23 AM2015-04-09T05:23:52+5:302015-04-09T05:23:52+5:30
ससाणेनगर ते सय्यदनगर रेल्वे मार्गाच्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करा; अन्यथा भुयारी मार्ग रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांसह
पुणे : ससाणेनगर ते सय्यदनगर रेल्वे मार्गाच्या परिसरातील नागरिकांचे पुनर्वसन करा; अन्यथा भुयारी मार्ग रद्द करण्याची मागणी भाजपाच्या आमदारांसह कार्यकर्त्यांनी केली. मात्र, भुयारी मार्गाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन काम सुरू झाले आहे. त्यामुळे आराखड्यात बदल न करण्याची भूमिका राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. त्यावरून राष्ट्रवादी-भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वादावादी सुरू झाली. अखेर हडपसरला जागेवर पाहणी करून निर्णय घेऊ, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिले.
रेल्वे मार्गाच्या ठिकाणी महापालिकेने भुयारी मार्ग प्रस्तावित केला आहे. त्याविषयीची निविदा प्रक्रिया २०१३ मध्ये राबविण्यात आली असून, २०१५ अखेर काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. परंतु, भाजपाने भुयारी मार्गाला विरोध केला आहे. त्या पार्श्वभूमीवर बापट यांच्या अध्यक्षतेखाली हडपसरमधील सर्वपक्षीय पदाधिकारी व नगरसेवकांची बैठक मुंबईत झाली. या वेळी आमदार योगेश टिळेकर, विजय देशमुख, फारुक इनामदार, विजया वाडकर, सुनील बनकर, दत्तोबा ससाणे, दिलीप तुपे उपस्थित होते.
(प्रतिनिधी)