दूरदर्शनच्या कॉपीराइटवरून वाद : माजी निर्मात्यास स्वसंग्रहातील कार्यक्रम सादरीकरणास मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 09:56 PM2018-08-31T21:56:29+5:302018-08-31T21:59:54+5:30
मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुदयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. Controversy over Doordarshan's copyright
नम्रता फडणीस
पुणे : मुंबई दूरदर्शनचे माजी निर्माते अरूण काकतकर यांच्या एकेकाळी दूरदर्शनवर सादर झालेल्या साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमांच्या स्वसंग्रहातील दुर्मिळ ठेव्यावरच कॉपीराईटच्या मुदयावरून प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या कार्यक्रमांवर मुंबई दूरदर्शनचा हक्क असल्याने
सार्वजनिक ठिकाणी या कार्यक्रमांचे परवानगीविना सादरीकरण करता येणार नाही
असा आक्षेप मुंबई दूरदर्शनकडून नोंदविण्यात आला आहे.
तीस ते चाळीस वर्षांपूर्वी विविध क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान दिलेल्या मान्यवरांचे मुंबई दूरदर्शनवर कार्यक्रम करताना अरूण काकतकर यांनी काहींचे खाजगी रेकॉर्डिंग करून ते जतन करण्याचे काम केले.या संग्रहात हिरोबाई बडोदेकर, मोगूबाई कुर्डीकर, माणिक वर्मा यांनी गप्पा आणि आठवणीतून खुलवलेली मैफल, बाकीबाब, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुरेश भट या कवींची मनोगत तसेच मंगेशकर कुटुंबियांची संवाद आणि गाण्यांची मैफल,राम शेवाळकर, डॉ. जयंत नारळीकर यांची व्याख्याने, अशा नानाविविध दुर्मिळगोष्टींचा समावेश आहे.
हा चित्रफिती आणि श्राव्यफितीचा अमूल्य ठेवा डेक्कन एज्युकेशन सोसायटीकडे सुपूर्त करून टप्याटप्याने या ठेव्याचे दर्शन रसिकांना घडविण्याचे नियोजन करण्यात आले होते. या सुंदरमालिकेतील ‘शांकुतल ते मानापमान’ हा कार्यक्रम येत्या 1 सप्टेंबर रोजी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अँम्फी थिएटरमध्ये सादर होणार होता. मात्र मुंबई दूरदर्शनचे सहाय्यक संचालक एम.एस थॉमस यांनी कॉपीराईटचा मुददा उपस्थित करत या खाजगी ठेव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. या संदर्भात त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्राचार्यांना मेल पाठवल्याने हा कार्यक्रमच रदद करण्यात आला.
मात्र स्वसंग्रही असलेले हे कार्यक्रमदूरदर्शनकडे देखील नाहीत असा युक्तीवाद काकतकर यांनी केला आहे.मुंबई दूरदर्शननेच नाटककार सुरेश खरे यांच्याकडे ‘शांकुतल ते मानापमान’ ची कॉपी आहे का? अशी विचारणा केली होती. आपले मूळ स्त्रोतच त्यांच्याकडे नाहीत यासारखे दुर्दैव नाही. त्यांच्या संग्रही असलेल्या ब-याचशा टेप्स या नष्ट झाल्या आहेत. दूरदर्शनकडे हा ठेवा असेल तर त्यांनी तो दाखवावा.गेल्या तीस ते चाळीस वर्षात त्यांनी तो का दाखवला नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या कार्यक्रमांचे जाहीर सादरीकरण करून पैसे कमावण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
दूरदर्शनचे कार्यक्रम शासनाची प्रोपर्टी
दूरदर्शनचे कार्यक्रम ही शासनाची प्रोपर्टी आहे, त्यावर मुंबई दूरदर्शनचा कॉपराईट आहे. कलाकारांना दूरदर्शनच्या खर्चाने बोलवले जाते, त्यामुळे
त्या कार्यक्रमांवर दूरदर्शनचाच अधिकार आहे. कार्यक्रमांचे खासगी रेकॉर्डिंग करून ते स्वसंग्रही ठेवले जाऊ शकते. मात्र सार्वजनिक ठिकाणी
दूरदर्शनची परवानगी न घेता त्याचे सादरीकरण करणे हा कॉपीराईटचा भंग आहे.
एम.एस थॉमस, व्यवसाय व महसूल विभाग, मुंबई दूरदर्शन