राजगुरुनगरमध्ये ‘१ रुपयात ड्रेस’ ऑफरचा गोंधळ, महिलांचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2025 12:24 IST2025-01-28T12:23:40+5:302025-01-28T12:24:16+5:30
ड्रेस मिळालाच नाही, म्हणून काही महिलांनी दुकानासमोर असलेल्या स्टॅच्यूवरचे कपडे काढले

राजगुरुनगरमध्ये ‘१ रुपयात ड्रेस’ ऑफरचा गोंधळ, महिलांचा संताप
राजगुरुनगर (पुणे) – राजगुरुनगर शहरातील एका कापड दुकानाने २६ जानेवारीच्या निमित्ताने महिलांसाठी “१ रुपयात ड्रेस” ही विशेष ऑफर जाहीर केली होती. या आकर्षक जाहिरातीमुळे ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. मात्र प्रत्यक्षात ड्रेस न देता दुकानदाराने अचानक दुकान बंद केले. यामुळे संतापलेल्या महिलांनी रस्त्यावर उतरून गोंधळ घातला आणि थेट राजगुरुनगर-भीमाशंकर मार्ग अडवला.
दुकानदाराची जाहिरात भोवली
महिलांसाठी १ रुपयात ड्रेस देण्याची योजना फक्त मार्केटिंगसाठी असल्याचं दिसतं. मात्र या जाहिरातीला ज्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला, त्यासाठी दुकानदार तयार नव्हता. ड्रेस मिळण्यासाठी आलेल्या महिलांना “ड्रेस संपले” असं सांगत दुकानच बंद केलं. या प्रकाराने महिलांचा संताप अनावर झाला आणि त्यांनी रस्त्यावर उतरत आपला रोष व्यक्त केला.
महिलांचा रोष आणि संताप
ड्रेस मिळालाच नाही, म्हणून काही महिलांनी दुकानासमोर असलेल्या स्टॅच्यूवरचे कपडे काढले तर काहींनी थेट रस्त्यावर बसून मार्ग अडवला. महिलांनी “आम्हाला ड्रेस मिळालाच पाहिजे” अशी ठाम भूमिका घेतली. त्यांच्या या आक्रमक वागण्यामुळे परिसरात मोठी गर्दी जमली होती.
पोलिसांचा हस्तक्षेप
गोंधळ वाढत चालल्याचं पाहून खेड पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलांनी “ड्रेस मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही” असा पवित्रा घेतला. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना खूप वेळ लागला.
जाहिरात की फसवणूक?
ग्राहकांसाठी आकर्षक वाटणारी “१ रुपयात ड्रेस” योजना खरेतर फसवणूक असल्याचं महिलांनी ठणकावून सांगितलं. “जाहिरातीद्वारे महिलांची खिल्ली उडवली गेली,” असा आरोप करत महिलांनी दुकानदारावर कडक कारवाईची मागणी केली आहे.
या घटनेमुळे राजगुरुनगरमधील इतर व्यापाऱ्यांमध्येही खळबळ उडाली आहे. एका व्यावसायिकाच्या चुकीमुळे इतरांच्या व्यवसायावरही परिणाम होण्याची शक्यता स्थानिक व्यापाऱ्यांनी व्यक्त केली.