भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून वाद; पुण्यातील उच्चभ्रू सोसायटीतील शेजारी एकमेकांना भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2023 11:00 AM2023-01-18T11:00:57+5:302023-01-18T11:05:10+5:30
सोसायटीत येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून एका उच्चभ्रू सोसायटीतील शेजारी आमने-सामने...
पुणे/किरण शिंदे : भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून वाद झाल्याचे प्रकार यापूर्वी अनेकदा घडले आहेत. पुण्याच्या हडपसर परिसरात आणखी एक असाच प्रकार घडला आहे. सोसायटीत येणाऱ्या भटक्या कुत्र्यांना खाऊ घालण्यावरून एका उच्चभ्रू सोसायटीतील शेजारी आमने-सामने आलेत. प्रकरण पोलीस ठाण्यात गेलं आणि या प्रकरणी आता गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.
ही घटना घडली फुरसुंगीतील पार्क इन्फिनिया या उच्चभ्रू सोसायटीत. या सोसायटीत राहणाऱ्या दिव्या राहुल तिवारी (वय 43) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. तर याच सोसायटीत राहणारे अंकित पाठक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 15 जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी की, फिर्यादी दिव्या तिवारी या सोसायटीतील भटक्या कुत्र्यांना जेवण खाऊ घालत असल्याने अंकित पाठक आणि त्याच्या पत्नीचे आणि फिर्यादीचे भांडण झाले. या भांडणाचा व्हिडिओ दिव्या तिवारी आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत असताना अंकित पाठक यांनी त्याचा मोबाईल हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. इतकंच नाही तर फिर्यादी यांच्या अंगावर धावून जात धक्का दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.