‘गणेशोत्सव’ जनकावरून पुण्यातील वाद टोकाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 04:44 AM2017-08-15T04:44:37+5:302017-08-18T14:50:08+5:30
गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
पुणे : गणेशोत्सवाचे जनक कोण, यावरून पुण्यातील वाद टोकाला गेला असून महापौर मुक्ता टिळक यांच्याविरोधात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.
भाऊसाहेब रंगारी हे सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक असल्याचे मान्य केल्यानंतर महापौर मुक्ता टिळक यांनी घूमजाव केल्याचा दावा ट्रस्टने केला आहे. २० आॅगस्टपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही ट्रस्टच्या पदाधिकाºयांनी दिला आहे.
महिनाभरापूर्वी टिळक यांनी चर्चेसाठी बोलावले होते, त्यात त्यांनी स्वत:च सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक भाऊसाहेब रंगारी असल्याचे मान्य केले होते, असे मंडळाच्या पदाधिकाºयांनी सांगितले. त्यासाठी त्यांनी चर्चेची आॅडिओ क्लिप सादर केली.
खासगी चर्चेत रंगारी यांचे
नाव मान्य करणाºया महापौर दुसºयाच दिवशी जाहीर चर्चेत मात्र
त्याला नकार देतात. त्यांनीच भाऊसाहेब रंगारी यांचे छायाचित्र मागवून घेतले, त्याला प्रसिद्धी
देऊ असेही सांगितले. मात्र त्यांनी
तसे केले नाही. ही पुणेकरांची फसवणूक आहे, असे पदाधिकाºयांनी सांगितले.
जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील ३५० गणेशोत्सव मंडळांनी त्यांच्या मंडपात रंगारी यांचे छायाचित्र लावण्याचे मान्य केले आहे. तशी पत्रे त्यांनी दिली आहेत. शहरातील अनेक मंडळांनी संमतीपत्र दिले आहे, असेही पदाधिकाºयांनी सांगितले.
गणेशोत्सवाचे हे १२५ वे वर्ष नसून १२६ वे आहे. हे सुद्धा महापालिका अमान्य करीत आहे. न्यायालयात हे सिद्ध करण्यासाठी पुरावे देणार आहोत, अशी माहिती मंडळाच्या पदाधिकाºयांनी दिली.