राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 19:30 IST2025-02-04T19:28:51+5:302025-02-04T19:30:38+5:30

त्यांच्या विधानामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली

Controversy over Rahul Solapurkar's statement; Shiv lovers angry outside Bhandarkar organization | राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप

राहुल सोलापूरकर यांच्या वक्तव्यावरून वादंग; भांडारकर संस्थेबाहेर शिवप्रेमींचा संताप

पुणे - मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानावर मराठा समाज आणि शिवप्रेमी आक्रमक झाले असून, भांडारकर प्राच्य विद्या संस्थेच्या बाहेर मोठ्या प्रमाणात आंदोलकांनी एकत्र येत निषेध नोंदवला.  

राहुल सोलापूरकर यांनी आपल्या वक्तव्यात, छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या विधानामुळे मराठा समाजात संतापाची लाट उसळली आहे. हे विधान छत्रपतींना बदनाम करण्याचा प्रयत्न आहे आणि त्यावर कारवाई झालीच पाहिजे. अशी मागणीही  मराठा समाजाकडून करण्यात आली.



संस्थेबाहेर आंदोलन, राजीनाम्याची मागणी

भांडारकर संस्थेबाहेर मराठा समाज आणि शिवप्रेमींनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली. आंदोलकांनी संस्थेच्या अधिकाऱ्यांकडे राहुल सोलापूरकर यांच्या हकालपट्टीची मागणी केली. मात्र, संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला नाही, त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र झाले. निवेदन देण्यासाठी आलेल्या आंदोलकांना पोलिसांनी संस्थेच्या मुख्य गेटच्या बाहेर रोखले. यामुळे आंदोलक आणखी आक्रमक झाले. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील अशी भूमिका आंदोलकांकडून घेण्यात आली.

संस्थेच्या भूमिकेचीही चौकशीची मागणी

आंदोलकांनी संस्थेच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संस्थेने आधी स्पष्ट करावे की, राहुल सोलापूरकर यांच्या विधानाशी ते सहमत आहेत का?" असा सवाल आंदोलकांनी केला. जर संस्था सहमत नसेल, तर त्यांच्या तातडीच्या राजीनामा घेण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.  

पोलिस बंदोबस्त वाढवला  

संस्थेबाहेर वाढत्या तणावामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. आंदोलक आणि पोलिसांमध्ये काही काळ संवादाचा प्रयत्न झाला, मात्र तो निष्फळ ठरला. या प्रकरणावर संस्था आणि राहुल सोलापूरकर यांची अधिकृत प्रतिक्रिया अपेक्षित आहे.आंदोलनकर्ते आपल्या मागणीवर ठाम आहेत. राजीनामा न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र होईल असा इशारा त्यांनी दिला आहे.    

Web Title: Controversy over Rahul Solapurkar's statement; Shiv lovers angry outside Bhandarkar organization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.